जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख |कर्जत – जामखेडमध्ये आज राजकीय धुळवड रंगणार असेच दिसत आहे.सध्या मतदारसंघात सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. आज (गुरूवारी) आजी व माजी आमदारांचे राजकीय कार्यक्रम मतदारसंघात होणार आहेत. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नांदीच या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहे.
आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (गुरूवारी) सकाळी कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज मंदिर परिसरात जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा किल्ला परिसरात बसवल्या जाणाऱ्या भारतातील सर्वात उंच ‘भगव्या स्वराज्य ध्वजाची’ विधिवत पूजा होणार आहे.
तेथून या ध्वजाची यात्रा देशभर जाणार आहे. देशातील ७४ तीर्थक्षेत्रात स्वराज्य ध्वज दाखल होणार आहे.
या कार्यक्रमाचे लाँचिंग राष्ट्रवादीच्या ‘भगव्या’ राजकारणाचे ‘संकेत‘ देणारे ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या कार्यक्रमात आमदार रोहित पवार काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
तर दुसरीकडे आज गुरूवारी दुपारी माजी मंत्री राम शिंदे हे जामखेडमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.जामखेड शहराची पाणी योजना व अन्य विषयावर पत्रकार परिषद होणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेच्या माध्यमांतून राम शिंदे हे आमदार रोहित पवारांचा बुरखा फाडणार का ? तसेच कोण कोणत्या राजकीय मुद्द्यांवर हल्लाबोल करणार याचीच उत्सुकता जामखेडकरांना लागली आहे.
दरम्यान कर्जत – जामखेड मतदारसंघात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहेत. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप समोर राष्ट्रवादीचे मोठे अव्हान असणार आहे. या निवडणुकांना सामोरे जात असताना तगड्या होमवर्कची गरज आहे.
दरम्यान गुरुवारचा दिवस मतदारसंघात राजकीय धुळवड उडवून देणारा ठरणार आहे. आमदार रोहित पवार काय भाष्य करतात ? राम शिंदे काय बोलतात याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.