Aditya Thackeray News : मोठी घडामोड ! शिवसेनेच्या मंत्र्याने घेतली आदित्य ठाकरेंची भेट ? राजकीय चर्चांना उधाण
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. शिवसेनेच्या फुटीनंतर उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे यांच्या गटांत रोज टीकास्त्राचे युध्द सुरू आहे. अश्यातच आता राज्याच्या राजकारणातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेनेच्या एका मंत्र्याने शिवसेना (उबाठा) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची नाशिक जवळील एका रिसॉर्टवर गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आले आहे.
नाशिकमध्ये शिवसेनेचे मंत्री दादा भूसे यांनी आदित्य ठाकरे यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या त्रिंबकेश्वर रोडवरील एका खाजगी रिसॉर्टवर ही भेट झाल्याची माहिती आहे. उभय नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं? ही भेट कोणत्या कारणासाठी होती? याचा तपशील अजून समोर आलेला नाही. या भेटीच्या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा जोरदार हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भूसे आणि शिवसेना (उबाठा) गटाचे नेते आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक झाली. आपला नियोजित दौरा अर्ध्यावर सोडून मंत्री दादा भूसे हे आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी खाजगी रिसॉर्टवर दाखल झाले होते. शैक्षणिक संस्थेचा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून तसेच सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत ही भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे हे स्वता: गाडी चालवत नाशिकला दाखल झाले होते. मंत्री दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांची भेट बेजे गावातील एका खाजगी रिसॉर्टवर झाल्याचे बोलले जात आहे.ठाकरे यांच्या भेटीसाठी भुसे हे मालेगावहून नाशिकला आले होते. दरम्यान या भेटीबाबत साम टीव्हीने वृत्त दिले आहे.