वातावरण तापलं : काँग्रेसचे 22 आमदार फुटणार, शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडाळीनंतर राज्यातील सत्तासंघर्ष अधिकच तीव्र बनला आहे. शिवसेना विरूध्द एकनाथ शिंदे गट यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयात अजूनही तोडगा निघालेला नाही, अश्यातच महाराष्ट्रात आणखीन एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा मोठा दावा शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याने केला आहे. या नेत्याच्या दाव्यानुसार एक दोन नव्हे तर चक्क 22 काँग्रेस आमदार फुटणार असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टात लवकरच फैसला होणार आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होऊन शिंदे सरकार कोसळणार,असा दावा करत शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिंदे सरकार पडणार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत,असा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.खैरे औरंगाबादेत बोलत होते.
शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास काँग्रेस पक्षाचे 22 आमदार फडणवीस यांच्यासोबत जाणार आहेत असे विधान करणाऱ्या खैरेंना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टोला लगावला आहे. पटोले म्हणाले, ज्यांना स्वता:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी दुसर्याच्या पक्षावर बोलू नये,असा टोला लगावला.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे आमदार फुटणार ही चर्चा नेहमी होत आहे. या चर्चेला खैरेंच्या विधानाने आता बळ दिले आहे. त्यामुळे आता अगामी काळात काँग्रेसला खरोखर खिंडार पडणार की काँग्रेस फुटणार ही चर्चा फक्त चर्चाच राहणार हे अगामी काळात दिसणार आहे. परंतू खैरी यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याचं राजकारण मात्र तापलं आहे.