जामखेड टाईम्स वृत्तसेवा : आजवर मी कोणावरही व्यक्तीगत टिका केली नाही परंतू केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांवर मी सातत्याने बोलत राहणार.जनतेचा आवाज बनत राहणार.मी कुठल्याही चौकश्यांना घाबरत नाही. “महाविकास आघाडी सरकार जाणार युतीचे सरकार येणार ही चर्चा बीजेपीला सतत जिवंत ठेवावीच लागेल. कारण ही गोष्ट जर,जिवंत नाही ठेवली तर काय माहिती उद्या पुढे जाऊन, पुढच्या काही महिन्यांमध्ये बीजेपीचे आमदार फुटतील ही भीती भाजपच्या नेतृत्वाला आहे” असा टोला लगावत आमदार रोहित पवार यांनी भाजपाचे आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. (BJP MLAs to split? : Rohit Pawar faces new discussion)
रोहित पवार आज एबीपी माझा वृत्तवाहिनीवर संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी वरिल भाष्य केले आहे. शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, कृषी, युवक, सह काँग्रेसचा स्वबळाचा नारा, प्रताप सरनाईक लेटर बाँब प्रकरण या विषयांवर रोहित पवारांनी आपली सडेतोड भूमिका मांडली.
कुठलेही पद तुमच्या कामामुळे जर तुमच्याकडे येत असेल तर….
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की लोक काय करतात याचा मी विचार करत नाही.मला जे योग्य वाटतं ते मी करतो. कुठलेही पद हे तुमच्या कामामुळे जर तुमच्याकडे येत असेल तर त्यासाठी काम करावे लागेल. मी आधीपण आणि आज पण उद्यापण लोकांचा कार्यकर्ता असणार आहे.काही ठराविक लोकांशी बोलून सेटिंग करून तुमच्याकडे पद येणार असेल तर मला योग्य वाटत नाही. लोकांच्या मनात राज्य करण्यासाठी तुम्हाला काहीतरी काम करावे लागेल आणि ते आता त्या ठिकाणी मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. प्रॅक्टिकल ओरिएंटेड एज्युकेशन कडे लक्ष देण्याची जरुरी आहे. कुठल्याही विभागामध्ये आपल्याला युवा धोरण असणे तितकेच महत्त्वाचे आहे. एक युवक कमिशन सुद्धा आपण तयार करणं आवश्यक आहे. आरोग्यावर आणि कुपोषण या विषयावर येत्या काळामध्ये मोठं काम करावं लागेल. राजकारणाची दिशा बदलणे आवश्यक.