कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रोहित पवारांविरोधात गुन्हे दाखल करा – राम शिंदे

आमचं एकच चुकलं झेंडे लावले नाहीत - शिंदे

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोना महामारीच्या काळात जास्तीची गर्दी केल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी आज गुरुवारी जामखेड मध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत केली.

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा किल्यावर उभारण्यात येणाऱ्या 74 फुटी भव्य भगव्या स्वराज्य ध्वजाची कर्जतमधील गोदड महाराज मंदिर परिसरात आज पुजा करण्यात आली. स्वराज्य ध्वज यात्रेचा आज कर्जतमधून शुभारंभ झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अलोट गर्दी लोटली होती. यावरून राम शिंदे यांनी रोहित पवारांना लक्ष केले आहे.

कोरोनाची तिसरी लाट निर्माण होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सातत्याने विरोधी पक्षांसह राजकीय पक्षांना गर्दीचे राजकीय कार्यक्रम न करण्याचे अवाहन करत आहेत. मात्र कर्जत – जामखेडचे आमदार मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत. तसेच आजोबाचेही ऐकत नाही. विद्यमान आमदारांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करून कर्जतमध्ये घेतलेल्या कार्यक्रमावर राम शिंदे यांनी टिका केली आहे. विद्यमान आमदारांनी बेजबाबदारपणा दाखवत गर्दी जमवली. नियम धाब्यावर बसवले. सदर कार्यक्रमात गर्दी जमवल्या प्रकरणी रोहित पवारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी शिंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे प्रशासनाकडे केली आहे.पत्रकार परिषदेत राम शिंदे यांनी विविध मुद्द्यांना हात घालत आमदार रोहित पवार यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान पुढे बोलताना राम शिंदे यांनी जामखेड शहर पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आमदार रोहित पवार यांच्याकडून केल्या जात असलेल्या दिशाभूलीवर भाष्य केले. कोणाच्याही मनामध्ये, ध्यानामध्ये नव्हतं की उजनीवरून जामखेड शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो परंतु मी इच्छाशक्ती दाखवली.एवढ्या मोठ्या पाणीपुरवठा योजनेचा आपण जवळपास दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करीत होतो त्याला सरकारने तत्वतः मान्यता दिली होती.

पण गेली 24 महिने ही योजना सुरू झाली नाही. श्रेय घेण्यासाठी ती रखडवली गेली. जर ही योजना वेळेत झाली असती असतील जामखेडचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटला असता. पाणीयोजनेचे  सुरुवात कधी झाली ? कोणी केली कोणाच्या काळात झाली ? कोणते नगरसेवक होते?  कोण नगराध्यक्ष होते? कोणी एक टक्का रक्कम भरली ? कोणी पाठपुरावा केला ?  हे जामखेडकर जनतेला माहित आहे. पण विद्यमान आमदार श्रेय घेण्यासाठी करत असलेला प्रयत्न केविलवाणा आहे. यावेळी राम शिंदे यांनी जामखेड शहर पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरी प्रक्रियेचे कागदपत्रे, वर्तमानपत्रातील जाहिराती दाखवत रोहित पवारांना लक्ष्य केले.

आमचं एकच चुकलं झेंडे लावले नाहीत..

पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, भगवा झेंडा लावायचं विद्यमान आमदारांनी ठरवलं आहे. भगव्या झेंड्याच्या प्रति सर्वांनाच अभिमान आहे. भगवा झेंडा लावलाच पाहिजे पण खर्डा किल्ल्याच्या विकासासाठी मी मंत्री असताना साडे सात कोटी रूपयांची योजना तयार केली होती. तेव्हा 3 कोटी 86 लाख रूपये मंजुर करून आणले होते. यातून अनेक कामे केली.ही कामे करत असताना आमचं एकच चुकलं, विसरलं,आम्ही कामे केली पण झेंडे लावले नाहीत.झेंडा लावायचं काम ते करतात त्यांना शुभेच्छा आहेत पण खर्डा किल्याचा जो रखडलेला निधी आहे तो तरी तातडीने आणावा असे अवाहन शिंदे यांनी केले.

उद्घाटने करा पण कामे कोणी मंजुर केली हेही जनतेला सांगा

माझ्या मंत्रिपदाच्या काळात मंजुर करून आणलेल्या कामांचे सध्या विद्यमान आमदार उद्घाटने करत आहेत. माझा उद्घाटनाला मुळीच विरोध नाही. पण किमान कामे कोणी आणली हे जनतेला सांगायचे धाडस आमदारांनी दाखवावे. मागच्या दोन वर्षांत तालुक्यात एकही सिमेंट बंधार विद्यमान आमदार तयार करू शकले नाहीत. मी केलेल्या जलयुक्तच्या कामांमुळे तालुक्यात एकही टँकर लागला नाही.

विकास फक्त सोशल मिडीयावर झळकतोय

माझ्या काळात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे केली पण यांच्या काळात रस्त्यांच्या दुरूस्त्याही होईनात. सध्या जामखेड शहरासह तालुक्यातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे.पोस्टरबाजी करायची आणि फक्त फेसबुक व्हाट्सअप  विकास पाहायचा आणि एक मिनिटाला काय तासाला काय अर्ध्या तासाला नवीन पोस्ट सोडायच्या एवढच काम विद्यमान आमदारकडून सुरू असल्याचे शिंदे म्हणाले.

दबाव टाकून पक्षांतर घडवले जात आहे

मोठ्या मताधिक्याने निवडून येऊनही आज देखील त्यांना माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश द्यावा लागतोय. त्यांच्यावर ही वेळ का आली ? याचं आमदारांनी आत्मपरीक्षण करायला हवं. दहशतीच्या बळावर, अडवणूक करून , दबाव टाकून कार्यकर्त्यांना जेरीस आणले जात आहे. पक्षात प्रवेश दिला जात आहे असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.

राम शिंदे यांची संपुर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी इथे क्लिक करा