जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राज्यातील महाविकास आघाडी सरकार अमूक तारखेला पडणार – तमूक तारखेला पडणार अश्या वल्गना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने केल्या जात आहेत. परंतू सरकार पाडण्याचे सर्व डाव अपयशी ठरले आहेत. अश्यातच धुलीवंदनाच्या दिवशी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत मोठा गौप्यस्फोट करत राज्याच्या राजकारणात धुराळा उडवून दिला आहे. (25 MLAs of Mahavikas Aghadi will join BJP – Raosaheb Danve’s Claim)
निवडणूका लागल्या की महाविकास आघाडीतील 25 आमदार भाजपात येतील असा दावा दानवे यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते पण ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जश्या निवडणूका लागतील, तसे ते भाजपात दाखल होतील, 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “आम्ही कधीच कोणाच्या पाठीत वार केला नाही. यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी युती तोडली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झाली आहे,” असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला सुनावलं.
“ज्या दिवशी शिवसेनेनं आम्हाला सोडलं आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. उरलेली इज्जत वाचवण्यासाठी सध्या ते भगवा-भगवा करत असतात. त्यामुळे भेसळ आमच्यात आहे की त्यांच्यात हे त्यांनी तपासून पाहावं. भेसळ एकट्याची होत नसते, तर दोन-तीन एकत्र आले की ती भेसळ होत असते,” अशी खरपूस टीका दानवेंनी केली.