आपला माणूस आपल्या भेटीला : आमदार प्रा. राम शिंदेंकडून गावभेट जनसंवाद पदयात्रेची घोषणा, मंगळवारी जातेगावमधून होणार जनसंवाद पदयात्रेचा प्रारंभ!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी हाती घेतली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात सुध्दा राजकीय वातावरण चांगलेच तापले. स्थानिक भूमिपुत्र आमदार प्रा. राम शिंदे यांनी निवडणूक तयारीत मोठी आघाडी घेतली आहे. जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांनी गावभेट जनसंवाद पदयात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा संपूर्ण मतदारसंघात राबवली जाणार आहे. या यात्रेचा प्रारंभ मंगळवारी २४ रोजी जातेगाव येथील जागृत देवस्थान श्री केदारेश्वराचे दर्शन घेऊन होणार आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी हाती घेतली आहे. या निवडणुकीत त्यांचा सामना ‘बारामतीच्या रोहित पवारांशी’ होणार आहे. आपल्या मतदारसंघाचा आमदार स्थानिक भूमिपुत्रच हवा, ही भूमिका अनेकांकडून गावोगावी जोरकसपणे मांडली जात आहे. या मागणीला जनतेतून तुफान प्रतिसाद मिळत आहे. यामुळे रोहित पवारांविरोधात मतदारसंघात मोठी लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे आमदार राम शिंदे यांच्या दौर्यांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या रक्षाबंधन सोहळ्यांना मतदारसंघातील हजारो लाडक्या बहिणींकडून मिळालेला तुफान प्रतिसाद आमदार शिंदे यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाल्याचे संकेत देणारा ठरला आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्याकडून आता गावभेट जनसंवाद पदयात्रेची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी (२४ रोजी), जातेगाव येथील जागृत देवस्थान श्री केदारेश्वराचे दर्शन घेऊन या पदयात्रेची सुरुवात होणार आहे. ३२३ किलोमीटरची ही पदयात्रा पाच दिवस जामखेड तालुक्यात चालणार आहे. राजुरी, घोडेगाव, साकत व पाटोदा या गावांमध्ये यात्रेचा मुक्काम असणार आहे. पदयात्रेची समाप्ती बोर्ले गावात होणार आहे. पदयात्रेत आमदार प्रा. राम शिंदे यांच्या सोबत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
‘आपला माणूस आपल्या भेटीस’ ही टॅगलाईन घेऊन आमदार प्रा.राम शिंदे हे गावभेट जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमांतून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेणार आहेत, आजवर त्यांनी जामखेड तालुक्यात जो विकास केला आहे त्याची माहिती ते जनतेला देणार आहेत, तसेच राहिलेले प्रश्न जाणून घेणार आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. पदयात्रेत ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जेवणासाठी थांबणार आहेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत ही पदयात्रा पोहचणार असल्याने जनतेत आमदार शिंदे यांच्या यात्रेची मोठी उत्सुकता आहे.
यात्रेचा पहिला दिवस असा असणार
मंगळवारी सकाळी आठ वाजता जातेगाव येथील जागृत देवस्थान श्री केदारेश्वराचे दर्शन घेऊन या जनसंवाद पदयात्रेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ही यात्रा दिघोळ, माळेवाडी, मोहरी, जायभायवाडी, तेलंगशी, धामणगाव, देवदैठण, नाहूली, नायगाव, घुलेवाडी, सतेवाडी, डोळेवाडी एकबुर्जी, बिंडावस्ती, शिऊर व राजुरी असा असणार आहे. राजुरी गावात पहिला मुक्काम असणार आहे.