वातावरण तापलं ! आमदार राम शिंदेंविरोधात टीका होताच भाजप आक्रमक मोडवर, शरद कार्लेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे विरुद्ध पवार हा संघर्ष पुन्हा पेटला आहे. आमदार राम शिंदेंविरोधात राष्ट्रवादीने निषेध अंदोलन केले. या अंदोलनात शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर भाजपही आता आक्रमक झाली आहे. भाजपा युवा मोर्चाचे जामखेड तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे वाभाडे काढले.
यावेळी आपली भूमिका मांडताना शरद कार्ले म्हणाले की, शासनाचे नियम मोडून साखर कारखाना चालु करणा-या बारामती ॲग्रोच्या शेटफळगडे येथील कारखान्यावर कारवाई करावी ही आमदार प्रा राम शिंदे यांची मागणी असुन या भूमिकेचे पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यासह कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी समर्थन केले आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चमकोगिरी बंद करावी.
तुम्ही जर चुकीला चूक म्हणू शकत नसाल,तर ही चमकोगिरी करून काय साध्य करणार आहात ? असा सवाल करत आपल्याला किंमत यावी यासाठी जामखेड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित पवारांच्या मनमानी कारभाराचे समर्थन करून चमकोगिरी करण्याचं काम करत आहेत, परंतु भविष्यात ज्या शेतकऱ्यांची पिळवणूक होणार आहे, याची चमकू कार्यकर्त्यांना कुठलीही काळजी नाही असा थेट हल्ला कार्ले यांनी राष्ट्रवादीवर चढवला.
भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष कार्ले पुढे बोलताना म्हणाले की, आमदार प्रा राम शिंदे यांनी बारामती ॲग्रोच्या शेटफळगडे हा कारखाना गाळप हंगामापूर्वी सुरू झाला आहे. कारखान्याने नियमभंग केला आहे. कारखान्यावर नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जळफळाट झाला आहे. आमदार रोहित पवार यांना खुश करण्यासाठी जामखेड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चमकोगिरी करून अंदोलन केले जात आहे असा टोला शरद कार्ले यांनी लगावला.
शासकीय नियम मोडून कारखाने आधी चालू करायचे आणि आपल्या जवळच्या लोकांचा ऊस तोडून घ्यायचा आणि नंतर उशीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा ऊस राहिला आहे त्यांच्याकडून कमी भावामध्ये ऊस खरेदी करायचा अशी सरंजामी कारखानदारांनी चालू केली आहे. वास्तविक सर्वांना नियम सारखेच असले पाहिजेत.या कारखानदारांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी शेतकरी पुत्र आमदार प्रा.राम शिंदे यांनी कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे अशी भूमिका शरद कार्ले यांनी यावेळी बोलताना मांडली.
नियम मोडल्यावर शेतक-यांचा फायदा होतो आणि नियम पाळल्यावर तोटा होतो. हा जावईशोध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुठून लावला ? असा रोकडा सवाल करत शरद कार्ले पुढे म्हणाले की, आमदार रोहित पवार यांच्यासमोर कुठलंही विकासकाम प्रसिद्धीसाठी नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कुठलीही किंमत राहिलेली नाही. आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी केलेला मनमानी कारभार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना का दिसला नाही. आमदार प्रा राम शिंदे यांनी मंजूर केलेली कामेच रोहित पवार आत्तापर्यंत करत आहेत. याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भान ठेवावे अशी खोचक टीका कार्ले यांनी केली.
ज्यावेळी उसाचा हंगाम संपत येतो तरी देखील सभासदांचा ऊस तोडला जात नाही आणि शेतकऱ्याला अडचणीत आणलं जातं, अशावेळी शेतकऱ्यांना ऊस तोडण्यासाठी टोळी मालकाला व त्यांच्या कारखान्याच्या लोकांना पैसे द्यावे लागतात आणि ऊस तोडून घ्यावा लागतो. मग याच काळात शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. कमी भावामध्ये ऊस खरेदी करण्याचे काम हे कारखानदार लोक करत असतात. याच्याच विरोधात आवाज उठवत आ.प्रा.राम शिंदे यांनी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी याकरिता कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे त्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी शरद कार्ले यांनी केली आहे.
राज्य सरकारने शासन निर्णय करून, साखर कारखान्यांना अटीशर्ती घालून दिल्या याचा अर्थ शासनाच्या या अटीशर्थी शेतक-यांच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर असणार आहेत. मात्र ऊस उत्पादक शेतकरी नसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चमकोगिरी बंद करून, ऊस उत्पादक शेतक-यांचे दु:ख जाणून घ्यावे. म्हणजे कारखानदारांची मनमानी काय असते ते समजेल. शेतक-यांच्या जखमेवर मिठ चोळायचे बंद करून,चमकोगिरी आणि भूलभुलैया थांबवावा असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी दिला आहे.