आमदार राम शिंदे उतरले बारामती ॲग्रोविरोधात मैदानात, राज्याच्या साखर आयुक्तांकडे केली मोठी मागणी, राजकीय वर्तुळात उडाळी मोठी खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत – जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार हा संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. आमदार राम शिंदे यांनी बारामती ॲग्रोविरोधात दंड थोपटले आहेत. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची शिंदे यांनी भेट घेत मोठी मागणी केली आहे.
गेली अडीच वर्षे शांत दिसणारे आमदार राम शिंदे मागील काही महिन्यांपासून मतदारसंघासह राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.
एकिकडे शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांविरोधात मोर्चा उघडलेला असतानाच आता बारामती लोकसभा मतदारसंघातही पवार कुटूंबाविरोधात शिंदे यांनी जोरदार मोर्चा उघडला आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याविरोधात आमदार राम शिंदे मैदानात उतरले आहेत.
यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी सुरू करणाऱ्या बारामती ॲग्रो लिमिटेड, शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मोठी मागणी आमदार राम शिंदे यांनी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील साखर कारखान्यांनी १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू केल्यास संबंधित साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच जारी केले होते.या आदेशानुसार सन २०२२-२३ या चालू वर्षीच्या गाळप हंगाम दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करावा, असा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत झालेला आहे.
जे कारखाने १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी गाळप हंगाम सुरू करतील अशा कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या १९ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या सभेत देण्यात आले आहेत. १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी कारखाना सुरू केल्यास महाराष्ट्र राज्य साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊस वितरण नियमन) आदेश, १९८४ खंड ४ चा भंग होतो.
तथापि, बारामती ॲग्रो लिमिटेड, शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या साखर कारखान्याने या वर्षीचा गाळप हंगाम दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी सुरू करून कायद्याचा भंग केलेला आहे. आज सोमवार, १० ऑक्टोबर २०२२ रोजी या कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती अॅग्रो लिमिटेड, शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्या कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान आमदार राम शिंदे यांनी निवेदनासोबतच बारामती अॅग्रो लिमिटेड, शेटफळगडे, तालुका इंदापूर जिल्हा पुणे या साखर कारखान्याने आज दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू केलेल्या गाळप हंगामाची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफित (क्लिपिंगज्) साखर आयुक्तांना दिले आहेत.
दरम्यान, आमदार राम शिंदे उडवून दिलेल्या राजकीय खळबळीनंतर आमदार रोहित पवार यावर काय उत्तर देणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.