शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, धनगर समाजाच्या उत्थानासाठी 22 योजना पुन्हा सुरु, सरकारचे मनापासून आभार – आमदार राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर उध्दव ठाकरे सरकारने रद्द केलेले अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेले निर्णय बदलण्यात आलेत. धनगर समाजाबाबतही शिंदे सरकारने नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील धनगर समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
धनगर समाजासाठी जुना निर्णय पुन्हा सुरू करण्यात आला आहे. 22 योजना सरकारकडून नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. तसे आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
धनगर समाजाच्या उत्थानासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ३० जुलै २०१९ रोजी आदिवासी समाजाला ज्या ज्या शासनाच्या सवलती त्या त्या धनगर समाजाला सवलती देण्याचा शासन निर्णय केला त्यासाठी १००० कोटी रुपयाची तरतूद केली, परंतु महाविकास आघाडी सरकारने हा शासन निर्णय बासनात गुंडाळून ठेवला आणि धनगर समाजाविषयीची वक्र दृष्टिकोनची जाणीव करून दिली,
पण पुन्हा राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तो शासन निर्णय प्रभावीपणे लागू करावा असा आदेश पारित केला .महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीने शिंदे – फडणवीस सरकारचे मनापासून त्रिवार अभिनंदन असे ट्विट आमदार राम शिंदे यांनी केले आहे.
शिंदे – फडणवीस सरकारने राज्यातील धनगर समाजासाठी घेतलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील धनगर समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सर्वच स्तरातून सरकारचे अभिनंदन होत आहे.