महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार काल कोसळले होते.आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले. त्यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

त्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळासह एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट असे नवे सरकार आता राज्यात स्थापन होणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज भवनातून आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठी घोषणा केली आहे.एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असणार आहेत अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणीस यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्राचा राजकारणात नवा भूकंप झाला आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपकडून देवेंद्र फडणीस हेच मुख्यमंत्री असतील अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच धक्का देत मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले आहे यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि मित्रपक्षांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, “गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला.

या अडीच वर्षाच्या काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला, या सरकारचे दोन मंत्री तुरुंगात जाणं हे खेदजनक आहे. एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून काढण्यात आलं नाही. शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने संभाजीनगर हे नामांतर केलं. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही, पण ती घेतली असे फडणवीस म्हणाले.