जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर होत असलेल्या अंधेरी पोटनिवडणूकीबाबत भाजपने आज मोठी घोषणा केली आहे.
भाजपने अंधेरी निवडणुकीतून माघार घेतली असून निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. कोर्टांच्या आदेशानंतर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भाजप व शिवसेनेकडून (ठाकरे गट) मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज भरण्यात आला.
परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहीत रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी मागणी केली होती. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. यानंतर अखेर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांमध्ये महत्वाची बैठक झाली. या बैठकीत भाजपने अंधेरी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे आता मुरजी पटेल आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेणार आहेत.