जामखेड बाजार समिती निवडणुकीचे उमेदवार आणि रणनिती ठरविण्यासाठी भाजपने बोलावली बैठक, आमदार प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत चोंडीत होणार बैठक
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी आमदार प्रा राम शिंदे याच्या नेतृत्वाखाली भाजपने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने उद्या 26 मार्च 2023 रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामखेड बाजार समिती निवडणुकीसाठीचे उमेदवार आणि रणनिती ठरविण्यासाठी बैठक बोलावली आहे.
जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.18 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. बाजार समितीवर भाजपची सत्ता होती. ही सत्ता कायम ठेवण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या 26 मार्च 2023 रोजी दुपारी 1 वाजता आमदार प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत निवडणूकीसाठी उमेदवार ठरवणे आणि रणनिती यावर चर्चा होणार आहे. या निवडणुकीत भाजप तगडा पॅनल रिंगणात उतरवणार आहे. त्यादृष्टीने भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी हाती घेण्यात आली आहे.
जामखेड बाजार समिती निवडणूक आढावा बैठक आमदार प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीसाठी तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, सेवा संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे प्रमुख पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसे निरोप सर्वांना देण्यात आले आहेत. जामखेड बाजार समितीची निवडणूक कसल्याही परिस्थितीत जिंकायचीच या इराद्याने भाजपाने तयारी हाती घेतली आहे.