मोठी बातमी : भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांच्या माघारीनंतर समर्थकांचा संताप, पटेल समर्थकांकडून राज ठाकरे आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर सध्या पोटनिवडणुक सुरू आहे. या निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने पटेल यांचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी पक्षाच्या आदेशानुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.या निर्णयामुळे पटेल यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाराज कार्यकर्त्यांनी आक्रमक होत मनसे विरोधात घोषणा दिल्या. निवडणूक कार्यालयाजवळ हा गोंधळ झाला. भावना अनावर झालेले कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी देत होते.
भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आक्रमक झालेल्या पटेल समर्थकांनी मनसे आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे या निवडणुकीत आणखीन एक नवा ट्विस्ट आलेला आज दिसला.
राज ठाकरे यांच्या पत्रानंतरच मुरजी पटेल यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली असे पटेल समर्थकांचे म्हणणे आहे. आक्रमक कार्यकर्त्यांनी राज ठाकरे मुर्दाबाद मनसे हाय हाय अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. पटेल यांचे कार्यकर्ते भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देताना दिसत होते. संतप्त कार्यकर्ते भाजपने धोका दिला असा आरोप करताना दिसत होते. एकुणच या निवडणुकीला नवे मिळाल्याचे यानिमित्ताने पहायला मिळाले आहे.