शरद पवारांच्या बालेकिल्ल्यावर भाजपची नजर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भाजपला विजय मिळवण्यास कठिण असलेल्या देशातील 141 मतदारसंघात भाजपने मिशन 2024 हाती घेतले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्याची रणनिती भाजपने आखली आहे. बारामती मतदारसंघ पवारांच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे असणार आहे.
राज्यातील सत्तांतर होताच भाजपने महाराष्ट्र पक्ष मजबुतीची मोहिम गतिमान केली आहे. मिशन 2024 ला राज्यातील जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची मोहिम भाजपने हाती घेतली आहे. भाजपला कधीच विजय मिळवता आला नाही अश्या मतदारसंघात भाजपने अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ कसल्याही परिस्थितीत जिंकायचाच या इराद्याने भाजपने आपले डावपेच टाकण्यास सुरुवात केली. राज्यातील भाजप नेत्यांच्या साथीला आता केंद्रीय मंत्र्यांकडे अवघड मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघातील भाजपाचे वजनदार नेते आमदार राम शिंदे यांच्याकडे पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली होती. आता शिंदे यांच्या साथीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन असणार आहेत.
मिडीया रिपोर्ट नुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ह्या येत्या 16 ते 18 ऑगस्ट या कालावधीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात त्या बारामती, दौंड, इंदापूर, खडकवासला, भोर, पुरंदर या भागांना भेटी देणार आहेत. या भेटीत भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याबरोबरच केंद्रीय प्रकल्पांना त्या भेटी देणार आहेत. याशिवाय केंद्राच्या लाभार्थ्यांसोबत त्या संवाद साधणार आहेत.
दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या दौर्याआधी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बारामतीत बैठक होणार आहे. आमदार राम शिंदे, राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, भीमराव तापकीर सह आदी महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.