जामखेड बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकणार – आमदार प्रा राम शिंदे, जामखेड भाजपची निवडणूक रणनिती बैठक संपन्न
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अगामी निवडणूकांच्या दृष्टीने बाजार समितीची निवडणूक महत्वाची आहे. जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने लढवणार आहे.कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.उमेदवार कोण यापेक्षा पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी सर्वस्व पणाला लावावे. कोणी नाराज होणार नाही याची आपण पुर्ण काळजी घेऊ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली मजबुत पकड आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक आपणच जिंकणार आहोत, परंतू कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये, असे अवाहन आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.
जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची रणनिती ठरवण्याबरोबरच उमेदवार निवडण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक 26 मार्च 2023 रोजी दुपारी पार पडली.बैठकीत अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.त्यानंतर बैठकीला मार्गदर्शन करताना आमदार प्रा राम शिंदे बोलत होते. यावेळी भाजपचे सर्व नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक गावांचे सरपंच आणि सेवा संस्थांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, समोरचं नेतृत्व आणि पक्षावर आता कोणाचाच विश्वास राहिलेला नाही. सगळा बेबनाव आहे. समोरच्याने जाणीवपुर्वक बाजार समितीवर प्रशासक आणला होता. त्यामुळे आता आपल्याला बाजार समितीची निवडणूक जिंकायचीच आहे. मी पालकमंत्री असताना आपण निवडणूका जिंकल्या. त्यावेळी राष्ट्रवादीला कोणी जवळ घेत नव्हतं पण आपण त्यांना जवळ घेतलं. त्यांना निवडून आणलं. त्यामुळे विरोधकांना माझ्याविषयी आत्मीयता वाटते असे ते म्हणाले.
पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, बाजार समितीची निवडणूक दुरंगी व्हायची का तिरंगी हे पुढचे पुढे बघू. अर्ज माघारी घेईपर्यंत काहीपण होऊ शकतं. दहा वर्षे मी सत्तेत असताना कुठेही कटुता आली नाही, कोणाची चौकशी लावली नाही, कोणाला त्रास दिला नाही, कोणाला आत टाका म्हणलं नाही, सौहार्दाच्या वातावरणात सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक भाजपच जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. लोकांना फार सांगायची आवश्यकता नाही, कारण लोकांना अनुभव आले आहेत, असे ते म्हणाले.
भाजपची अशी असणार निवडणूक रणनिती
जामखेड बाजार समिती निवडणूकीचे उमेदवार ठरविण्यासाठी पंचायत समिती गण निहाय उमेदवारी ठरवण्याची टीम बनवण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला. गण निहाय टीममध्ये 3 ते 5 जणांचा समावेश करण्यात आला. या टीममध्ये ज्याला निवडणूक लढवायची नाही अश्या नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला नाही. 25 जणांवर बाजार समितीचे उमेदवार ठरविण्याची जबाबदारी आमदार प्रा राम शिंदे यांनी सोपवली. एका गणाची जबाबदारी ज्या टीमवर आहे त्या टीमने तालुक्यात इतर ठिकाणी डोकं लावायचं नाही, अशी सुचना आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी दिली.