जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात पार पडत असलेल्या नगरपंचायतीची निवडणूक काळी निवडणूक आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असे अवाहन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.
भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे शनिवारी बीड जिल्ह्यातील आष्टी दौर्यावर होत्या. या दौऱ्यात राजकीय सभेला संबोधित करताना मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला घेरले.
ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सरकारने तातडीने दिला पाहिजे.ओबीसी आरक्षणाची लढाई लढत असताना मराठा आरक्षणाचीही लढाई लढावी लागणार आहे.ओबीसी व मराठा आरक्षणाबद्दलचा डाटा राज्य सरकारने तातडीने द्यायला हवा. या प्रश्नी महाराष्ट्र दौरा करणार आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी येत्या 26 जानेवारीपासून राज्यात दौरा करणार असल्याची घोषणा भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलताना केली.
राज्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या तोफा राज्यभर धडाधडत आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फेरीचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
ऐन गुलाबी थंडीत जामखेड शेजारील कर्जत व आष्टीचे राजकीय मैदान जोरदार तापले आहे. दोन्ही शहरात भाजप विरूध्द राष्ट्रवादी हा थेट सामना रंगताना दिसत आहे. कोण बाजी मारणार ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.