जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । BJP Mission 2024 । भाजपकडून मिशन 2024 हाती घेण्यात आले आहे.भाजपने 12 बड्या नेत्यांवर वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. यात अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वता: कडे ठेवली आहे. येत्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींसह शिंदे – विखे यांच्यावर थेट फडणवीसांचा वाॅच राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर अहमदनगर जिल्ह्यात भाजप कमजोर झालेली आहे. जिल्ह्यातील भाजप एकसंधपणे काम करताना दिसत नाही. प्रत्येक नेता आपापला गड सांभाळण्यात व्यस्त आहे. काहींचा मतदारसंघातील संपर्क तुटलेला आहे.अगामी निवडणूकीत भाजपला एकहाती सत्ता मिळवायची असेल तर अहमदनगर जिल्ह्यातून भाजपला मोठे यश मिळवावे लागेल.
भाजपने हाती घेतलेल्या मिशन 2024 ला ( BJP Mission 2024) यशस्वी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. त्यांनी अहमदनगरसह सोलापूर या दोन जिल्ह्यांची जबाबदारी स्वता:कडे घेतली आहे. या दोन्ही जिल्ह्यात अगामी काळात अनेक राजकीय उलथापालथी झालेल्या दिसणार आहेत. स्थानिक नेत्यांना अधिक काम करावे लागणार आहे. ज्या नेत्यांची कामगिरी दमदार तो नेता थेट फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जाऊन बसणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी विखे- शिंदे – राजळे – पाचपुते – कोल्हे सह आदी बड्या नेत्यांना स्वता: निवडून येत पक्षाला मोठे यश मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात ‘सोयरे-धायरे’ हा पक्ष नेहमी प्रभावी ठरत आलेला आहे. या पक्षाला उध्वस्त करून भाजपच्या जागा वाढवण्यासाठी आवश्यक अशी प्रभावी रणनिती देवेंद्र फडणवीस कशी राबवतात याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.
अहमदनगर जिल्हा भाजपात सध्या विखे विरुद्ध राम शिंदे असा छुपा वाद आहे. यात फडणवीस यांना गंभीरपणे लक्ष घालावे लागणार आहे. दुरावलेल्या निष्ठावंताना साद घालावी लागणार आहे. अगामी काळात विखे पिता-पुत्र आणि शिंदे यांना जिल्ह्यातील इतर नेत्यांशी समन्वय ठेऊन संघटन बांधणीसाठी मोहिम हाती घ्यावी लागणार आहे. शिंदे आणि विखे यांच्यावर थेट फडणवीस यांचा वाॅच राहणार असल्याने दोन्ही नेत्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार असेच दिसत आहे. येत्या काळात जिल्ह्यात काय काय घडामोडी घडतात त्यावर अनेक अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत.
ते नेते भाजपात उपरेच ?
भाजपने हाती घेतलेल्या मिशन 2024 या मोहिमेची जबाबदारी राज्यातील 12 नेत्यांवर सोपवली आहे. या यादीत भाजपचे जेष्ठ नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना स्थान देण्यात आलेले नाही. भाजपने हाती घेतलेल्या निवडणुक रचनेत विखे यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे, हर्षवर्धन पाटील यांनाही स्थान देण्यात आलेले नाही. काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेल्या या दिग्गज नेत्यांना भाजपने निवडणूक रणनितीच्या रचनेत स्थान न दिल्याने हे नेते अजूनही भाजपात उपरे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
15 एप्रिल पासुन भाजप नेते राज्याच्या दौर्यावर
अगामी निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपाने मिशन 2024 (BJP Mission 2024 ) मोहिम हाती घेतली आहे. ठाकरे सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी भाजपकडून येत्या 15 एप्रिलपासून राज्य पिंजून काढले जाणार आहे. यासाठी भाजपने 12 नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. या दौऱ्याचे समन्वय श्रीकांत भारतीय हे करणार आहेत. भाजपकडून ज्या 12 नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहेत त्यातील प्रविण दरेकर वगळता अन्य 11 नेते मुळ भाजपचे आहेत.
या नेत्यांवर सोपवण्यात आली जबाबदारी
1.देवेंद्र फडणवीस – सोलापूर, अहमदनगर
2.चंद्रकांतदादा पाटील – ठाणे ग्रामीण आणि नाशिक
3.सुधीर मुनगंटिवार – बीड, जालना
4.पंकजा मुंडे – कोल्हापूर, सांगली
5.आशिष शेलार – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
6. श्रीकांत भारतीय – नांदेड, परभणी
7. चंद्रशेखर बावनकुळे – अकोला, अमरावती
8. प्रविण दरेकर – पालघर, मिरा भाईंदर
9. गिरीश महाजन – उस्मानाबाद, हिंगोली
10.संजय कुटे – दक्षिण रायगड,उत्तर रायगड
11. रविंद्र चव्हाण – सातारा, पुणे ग्रामीण
12. रावसाहेब दानवे – बुलढाणा, नंदूरबार