Ram Shinde । राम शिंदेंच्या खांद्यावर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांच्या बालेकिल्ल्यावर राहणार राम शिंदेंचा वाॅच, देवेंद्र फडणवीसांची पाॅवरबाज खेळी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये विधानपरिषद (vidhan parishad election 2022) निवडणुकीचे वातावरण भलतेच तापले आहे.मतांची गोळाबेरीज करण्यात भाजप आणि महाविकास आघाडी गुंतले आहेत. त्यातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी मिशन लोकसभा 2024 (BJP Mission Lok Sabha 2024) हाती घेतले आहे. त्यादृष्टीने आज भाजपची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील 45 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भाजपने हाती घेतलेल्या मिशन लोकसभा 2024 या मोहिमेअंतर्गत प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या बड्या नेत्यांच्या नेमणुका करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात (Baramati Lok Sabha constituency) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी पाॅवरबाज खेळी करत माजी मंत्री राम शिंदे यांच्या खांद्यावर प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या बालेकिल्ल्यावर राम शिंदे यांचा वाॅच राहणार आहे. (Former Minister Ram Shinde bjp incharge of Baramati Lok Sabha constituency)
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी हाती घेतली आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या 16 मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला होता, त्या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची योजना भाजपने हाती घेतली आहे. त्याच दृष्टीकोनातून भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.या मतदारसंघाची जबाबदारी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री राम शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
भाजपचे मिशन 45 ( Maharashtra BJP’s mission 45 )
भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मिशन 45 हाती घेतले आहे. त्यासंदर्भात भाजपची आज मुंबईमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की,आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सोळा आणि अजुन आठ अशा मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष असणार आहे, यामध्ये बारामती, औरंगाबाद, बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, पालघर, रायगड, दक्षिण मुंबई, शिर्डी, शिरूर, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,हातकणंगले उस्मानाबाद या मतदार संघात भाजप जिंकून येण्यासाठी मोठी तयारी करत आहे, असेही यावेळी फडणीस यांनी स्पष्ट केले.
बारामती लोकसभा मतदारसंघावर राम शिंदेंचा वाॅच
देशाच्या राजकारणामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाला मोठे महत्त्व आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा हा मजबूत बालेकिल्ला आहे. पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मास्टर प्लान आखला असल्याचे बोलले जात आहे. तो प्लॅन अंमलात आणण्याची जबाबदारी फडणवीस यांनी आपले विश्वासू सहकारी राम शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे.त्यामुळे आता आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये राम शिंदे विरुद्ध पवार कुटुंबिय असा राजकीय संघर्ष होताना दिसणार आहे.
राम शिंदे यांचे भाजपात राजकीय वजन वाढले
माजी मंत्री राम शिंदे हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांंचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखले जातात. शिंदे आणि फडणवीस यांची जिगरी मैत्री राज्याच्या राजकारणात सर्वश्रूत आहे. राम शिंदे यांच्या पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे, येत्या 20 रोजी ते आमदार होणे जवळपास निश्चित आहे. त्यातच आता राम शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने बारामती सारख्या मोठ्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. एकूणच सर्व राजकीय घडामोडी पाहता माजी मंत्री राम शिंदे यांचे भाजपात राजकीय वजन वाढल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
कर्जत-जामखेड भाजपात उत्साह संचारला
दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांच्या खांद्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोपविल्यानंतर कर्जत जामखेड मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राम शिंदे यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याची बातमी मतदारसंघात धडकताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजप कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर राम शिंदे यांचे अभिनंदन केले जात आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात आमदार रोहित पवार विरुद्ध माजी मंत्री राम शिंदे हा संघर्ष तापलेला आहे, आता हाच संघर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातही होताना दिसणार आहे.