Breaking News : महाविकास आघाडीतील दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर, भाजप नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा भाजपा नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी केलेल्या दाव्याला चोवीस तास उलटत नाही तोच, भाजपच्या आणखीन एका मोठ्या नेत्याने महाविकास आघाडीतील दोन मोठे नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडणार असल्याचे यानिमित्ताने बोलले जाऊ लागले आहे. भाजपात प्रवेश करणारे ते दोन मोठे नेते कोण ? याबाबत आता विविध तर्क वितर्क लावले जाऊ लागले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. जागावाटपासंदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या बैठकीला महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला अधिकृत निमंत्रण दिले आहे. या घडामोडी सुरू असतानाच भाजप नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडीबाबत मोठा दावा केला आहे. देशमुख यांनी केलेल्या दिव्यांमुळे महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विरोधी पक्षातील अनेक मोठे नेते भाजपामध्ये येण्यास इच्छूक आहेत. अलीकडेच उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि माजी खासदार उल्हास पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यापूर्वी माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाला जगतगुरू करण्यासाठी अनेक नेते भाजपामध्ये येणार आहेत. आम्ही त्या सर्वांचे स्वागत करतो, असे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.
देशमुख पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकी वाटाघाटीसाठी तीनही पक्षाचे नेते सहभागी होत आहेत. त्यात महत्त्वाच्या नेत्यांपैकी दोन नेत्यांची भाजपशी पूर्णपणे बोलणी झालेली आहे. लवकरच ते भाजपामध्ये प्रवेश करतील. काही दिवस वाट पाहा. थोड्याच दिवसात भाजपा प्रवेशाचा मुहूर्त तुम्हाला कळेल, असे आशिष देशमुख यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातही फूट नक्कीच दिसणार आहे, असा खळबळजनक दावाही भाजप नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीतील मोठे दोन नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बघायला मिळतील, असा दावाही डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे.