Rohit Pawar vs Ram Shinde controversy | रोहित पवार विरूध्द राम शिंदे संघर्षात चंद्रकांत पाटलांची उडी !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार विरूध्द माजी मंत्री राम शिंदे (Rohit Pawar vs Ram Shinde controversy) हा संघर्ष टोकाला गेला आहे. शुक्रवारी या संघर्षाचे नवे रूप महाराष्ट्रासमोर आले.भाजपकडून निवडणूक लढवणारा उमेदवारच राष्ट्रवादीने (NCP) शुक्रवारी पळवून नेला. या संपुर्ण प्रकरणामुळे भाजपच्या (BJP) गोटात मोठी खळबळ उडाली.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत (Karjat Nagar Panchayat election) सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीची दखल थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी घेतली. कर्जतमध्ये घडत असलेल्या साम दाम दंड भेदाच्या राजकीय घडामोडींवर चंद्रकांत पाटलांनी भाष्य केले आहे.
आमदार रोहित पवार विरूध्द माजी मंत्री राम शिंदे या संघर्षात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उडी घेतली असून कर्जतमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून रोहित पवारांविरोधात जोरदार निशाणा साधला आहे. या सर्व प्रकरणावर त्यांनी एक ट्विट केले आहे.कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपच्या उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर आली हा त्यांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे अशी जोरदार टिका करत चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, शरद पवार यांचा वारसा, राज्यात सत्ता, अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही रोहित पवार यांना ऐकेका जागेसाठी झुंजावे लागते याचाच अर्थ जनता भाजपसोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे असे सांगत सत्तेचा दुरुपयोग आणि धनशक्ती विरोधात असली तरी जनशक्ती आपल्याकडे असल्याने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष करा असे अवाहन चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.
पक्ष राम शिंदेंच्या पाठीशी
कर्जत – जामखेड मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. रोहित पवार विरूध्द राम शिंदे हा संघर्ष सतत उफाळून येत राहिला. या संघर्षावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आजवर कधीच थेट भाष्य केले नव्हते.परंतू कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ज्या पध्दतीचे राजकारण घडत आहे आणि घडवून आणले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपने राम शिंदे हे एकटे नसुन त्यांच्या पाठीशी पक्ष पुर्ण ताकदीने उभा आहे हेच चंद्रकांत पाटलांनी शुक्रवारी रात्री केलेल्या ट्विटरवरुन दिसत आहे.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपा उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे @RRPSpeaksयांच्यावर आली हा त्यांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे. @PawarSpeaks यांचा वारसा,राज्यात सत्ता, @AjitPawarSpeaks उपमुख्यमंत्री असूनही रोहीत पवार यांना एकेका जागेसाठी झुंजावे लागते.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 17, 2021
विखे व शिंदेंना पवारांनी दिला जोर का झटका
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी कर्जत शहरात प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. अनेक प्रभागात त्यांनी सभा घेतल्या. जोरदार वातावरण निर्मिती केली. परंतु दुपारनंतर शहरात वेगाने राजकीय घडामोडी घडत होत्या. अश्यात राष्ट्रवादीची जाहिर सभा सुरू होण्यापूर्वीच प्रभाग क्रमांक १४ मधून भाजपाच्या तिकीटावर निवडणुक लढवत असलेल्या शिबा तारक सय्यद यांनी राष्ट्रवादीच्या ताराबाई कुलथे यांना ना धनंजय मुंडे, हार्दिक पटेल, आ रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पाठींबा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या अगोदरच जोगेश्वरवाडी आणि सोनारगल्ली दोन जागा बिनविरोध करीत माजीमंत्री राम शिंदे आणि खा सुजय विखे यांना जोर का झटका दिला.
हा सत्तेचा दहशतवाद – राम शिंदे
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत शुक्रवारी मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांनी ज्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या त्यातील प्रभाग 14 च्या महिला उमेदवाराने भाजपची साथ सोडत थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. या सर्व घडामोडीवर बोलताना राम शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाहीची सारे मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.
मविआ सरकारकडून लोकशाहीची सारीच मूल्य पायदळी तुडवली जात आहेत.
कर्जत नगरपंचायतीत धमकावून अनेकांना अर्ज मागे घ्यायला लावले.
आज प्रभाग 14च्या भाजपा उमेदवार शिबा सय्यद यांना राकाँत प्रवेश दिला.
सकाळीच त्यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती.
हा सत्तेचा दहशतवाद
जनता तुम्हाला माफ करणार नाही!— Prof.Ram Shinde (@RamShindeMLA) December 17, 2021
कर्जत नगरपंचायतीत धमकावून अनेकांना अर्ज मागे घ्यायला लावले आज प्रभाग 14च्या भाजपा उमेदवार शिबा सय्यद यांना राकाँत प्रवेश दिला.सकाळीच त्यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती. हा सत्तेचा दहशतवाद आसून जनता तुम्हाला माफ करणार नाही असे ट्विट करत शिंदे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.