जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्याच्या राजकारणातील निडर आणि झुंजार राजकीय नेतृत्व अशी ओळख असलेले भाजपा नेते सुभाष जायभाय यांचे आज दु:खद निधन झाले. जायभाय यांच्या निधनामुळे जामखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील रहिवासी असलेले जेष्ठ नेते सुभाष जायभाय हे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. त्याचबरोबर जामखेड बाजार समितीचे संचालक होते. तसेेच गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची जामखेड तालुक्याच्या राजकारणात ओळख होती.
अगामी जिल्हा परिषद निवडणूकीत ते भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते.ते आजारी असल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच आज दुपारी त्यांची अहमदनगरमध्ये प्राणज्योत मालवली.
भाजपाचे जेष्ठ नेते सुभाष जायभाय हे राजकीय आणि सामाजिक जीवनात निडर आणि झुंजार नेतृत्व म्हणून ओळखले जायचे. खर्डा परिसराच्या विकासासाठी ते नेहमी आक्रमक भूमिका घ्यायचे. त्यांनी केलेले अनेक अंदालने गाजले होते. लहानांपासून थोरांपर्यंत जायभाय यांना सर्वजण आप्पा या नावाने ओळखायचे. सुभाष जायभाय यांच्या दु:खद निधनामुळे जामखेड तालुक्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.