जामखेड टाईम्स वृत्तसेवा : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपकडून कर्जत जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री राम शिंदे यांना आज उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर होताच माजी मंत्री राम शिंदे यांनी विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Former Minister Ram Shinde has filed his nomination papers for the Legislative Council elections 2022)
20 जून रोजी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी कोणाला मिळणार ? याची राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना उत्सुकता होती.अखेर आज दुपारी भाजपच्या हायकमांडकडून महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
यामध्ये कर्जत जामखेडचे माजी आमदार तथा माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या नावाचा समावेश होता. राम शिंदे यांच्यासह पाच जणांची उमेदवारी आज भाजपकडून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे यांचा समावेश आहे.
माजी मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच कर्जत – जामखेड मतदारसंघासह राज्यभरातील शिंदे समर्थकांनी एकच जल्लोष केला. राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होणार याचे स्पष्ट संकेत कालच राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना मिळाले होते.
भाजपने आज दुपारी विधानपरिषदेच्या पाच नावांची घोषणा केली, घोषणा झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांच्या समर्थकांनी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी विधान भवनात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बबनराव पाचपुते, आमदार अतुल सावे, यावेळी उपस्थित होते.