इथून पुढच्या कालखंडामध्ये कोणालाही राजकारणाचा – प्रशासनाचा त्रास होणार नाही – आमदार राम शिंदेंनी दिली कार्यकर्त्यांना ग्वाही,चोंडीत पार पडला नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आपल्या भागाला अत्तापर्यंत बाजू धरायचं माहित नव्हतं, पण आता बाजू धरायची वेळयं, एकदा बाजू धरल्यानंतर बाजू सोडायची नसते. मग एकदा बाजू धरल्यानंतर आमच्या लोकांचा सत्कार करायचा एवढा मोह आवरला नाही तर, मग भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत निवडणुक मोठ्या मताधिक्याने जिंकलीय, त्याबद्दल अभिनंदन! अशी एखादी पोस्ट तर टाकायची अशी खोचक टीका करत आमचे लोकं नेऊन राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करणं हे काय प्रगल्भ राजकारणाचं लक्षण नाही असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला.
कर्जत-जामखेड मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या 11 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल आमदार राम शिंदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित 10 सरपंच आणि 86 ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य नागरी सत्कार चोंडी येथे आज करण्यात आला. यावेळी कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार राम शिंदे बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, आपल्या गावचा कारभार करत असताना वीज, रस्ते, पाणी, सार्वजनिक, वैयक्तिक प्रश्न आपल्या माध्यमांतून सुटणार आहेत. जनतेने घवघवीत यश आपल्या पदरात टाकले आहे. भाजपवर जनतेने जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ नये असे काम आपण सर्वजण मिळून करून दाखवू, कोणालाही निधीची कमतरता भासून दिली जाणार नाही असा शब्द यावेळी आमदार राम शिंदे यांनी दिला.
हे काय बरोबर नाही म्हणत आमदार राम शिंदेंनी लगावला रोहित पवारांना टोला
निवडणूूक काळात शेवटच्या घटकापर्यंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विरोध करायचा आणि विरोध केल्याच्या नंतर ते निवडून आले तर त्यांचा सत्कार करायचा, सत्कार करायचा तर मनामध्ये काहीतरी किंतू परंतू ठेवून करायचा हे काय बरोबर नाही, असे सांगत शिंदे म्हणाले आपण फक्त फेसबुकला पोस्ट टाकली आणि ऑफिसमधून निरोप पाठवले, आणि दुपारच्या वेळेत शंभर टक्के आपले लोक या ठिकाणी उपस्थित राहिले,असे शिंदे म्हणाले.
गावाची प्रामाणिकपणे सेवा करत रहा, तुम्हाला निधीची कमतरता भासून देणार नाही,
राज्यात आपलं सरकार नव्हतं आणि मीही आमदार नव्हतो, तेव्हा कुळधरण, कोरेगाव आणि बजरंगवाडी ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली होती. आता सत्ता आलीय, मीही आमदार झालोय, आता आता 11 ग्रामपंचायत पैकी आठ ठिकाणी भाजपने मित्रपक्ष आणि सहयोगी मित्रपक्ष यांच्या माध्यमांतून सत्ता मिळवली आहे. राहिलेल्या 3 पैकी राजुरी आणि निंबे या ग्रामपंचायतीत आपल्याला बहुमत आहे. भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,आता गावाची प्रामाणिकपणे सेवा करत रहा, तुम्हाला निधीची कमतरता भासून देणार नाही, असे सांगत आमदार राम शिंदे यांनी चोंडी येथे जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
कर्जत- जामखेडकरांमुळे नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात चांगला प्रसंग अनुभवायला मिळाला
अधिवेशन काळात निवडणुकीचे निकाल लागत होते तेव्हा.कर्जत-जामखेडकडे माझंही लक्ष होतं, तेव्हा तुम्ही इकडे जिंकत होतात, पुन्हा एकदा कर्जत-जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टीवर जनतेने भक्कम विश्वास दाखवला असं चित्र निर्माण झालं होत,त्या दिवशी मात्र विधानसभेमध्ये चित्र पाहण्यासारखं होतं, रोज फेसबुक आणि वाॅटसअपवर बोलणारे,सांगणारे, मागं कॅमेरेवाले बुम घेऊन फिरत होते. पण माणसं काही बोलायला तयार नव्हती.परंतू मी मात्र त्या दिवशी जोरात होतो.माझं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि बर्याच मंत्र्यांनी आणि आमदारांनी माझे अभिनंदन केले. ते अभिनंदन केवळ तुमच्यामुळे झालं, असा चांगला प्रसंग तुमच्यामुळे नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात अनुभवायला मिळाला, असे सांगत आमदार राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडमधील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
राजकारण हे विकासाचं ऐकमेकांला सहकार्य करण्याचं करणार – आमदार राम शिंदे
अगामी काळात मार्केट कमिटी असेल, जामखेड नगरपरिषद असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल या सगळ्या निवडणुकीला आपल्याला मोठ्या ताकदीने सामोरं जायचं आहे. गेल्या अडीच तीन वर्षांच्या कालखंडामध्ये जो प्रशासनाचा, राजकारणाचा, कामाचा वैयक्तिकरित्या जो त्रास झाला तो इथूनपुढच्या कालखंडामध्ये कोणालाही होणार नाही, याची मी शंभर टक्के ग्वाही देतो, राजकारण हे विकासाचं करू, राजकारण हे ऐकमेकाला सहकार्य करण्याचं करू, हीच भूमिका गेल्या 25 वर्षांत भारतीय जनता पार्टीची कर्जत-जामखेडमध्ये राहिलेली आहे. यापुढील कालखंडात हीच भूमिका आपण ठेवणार आहोत अशी भूमिका यावेळी आमदार राम शिंदे यांनी मांडली.
यावेळी भाजपाचे विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, जेष्ठ कार्यकर्ते काकासाहेब धांडे, जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, सोमनाथ पाचारणे, भाजपा जामखेड तालुकाध्यक्ष अजय काशीद, कर्जतचे तालुकाध्यक्ष डाॅ.सुनील गावडे, बळीराम यादव, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, माजी सभापती बाप्पु शेळके,पांडुरंग उबाळे, जामखेड भाजपा शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, बापूराव ढवळे, लहू शिंदे, नगरसेवक अमित चिंतामणी, मंगेश पाटील, सचिन पोटरे, गोरख घनवट, प्रवीण चोरडीया, ॲड.प्रवीण सानप, दादासाहेब वारे, वैजीनाथ पाटील, डाॅ अल्ताफ शेख, महारूद्र महारनवर, सुभाष काळदाते, संभाजी कोल्हे, चेअरमन अशोक महारनवर, बाजीराव गोपाळघरे, उमेश रोडे, यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.