Harshvardhan Patil: अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील संघर्ष शिगेला, हर्षवर्धन पाटलांनी लिहिले मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र;पत्रात काय ? जाणून घ्या सविस्तर
Harshvardhan Patil Indapur : एकिकडे महायुतीत असलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar) लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.तर दुसरीकडे अजित पवार विरुद्ध भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हा संघर्ष इंदापूरात पुन्हा तापताना दिसू लागला आहे. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे (Ankita Patil Thackeray) यांनी मागील आठवड्यात अजित पवारांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde devendra fadanvis) एक पत्र (Letter) लिहीले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी बाहेर काढलेला लेटर बाँब महायुतीत मिठाचा खडा टाकणारा तर ठरला नाही ना ? अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गटातील नेत्याने भर सभेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली होती. आता हर्षवर्धन पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्याला मित्रपक्षांकडूनच धमकी मिळत असल्याची तक्रार केली आहे. तसेच अशा लोकांवर योग्य ती कारवी करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात.
मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे.
सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेउन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, हि विनंती. असे पत्रात म्हटले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वरिल पत्र लिहले आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघ हा बारामती लोकसभेच्या अंतर्गत येतो. बारामतीत यंदा शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत होण्याची चिन्हे आहेत. अशावेळी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोन्ही गटातील वाद पुन्हा एकदा समोर आल्याने अजित पवारांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत.
भाजपा नेते हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांचा आहे. हर्षवर्धन पाटील यांना डॅमेज करण्यासाठी अजित पवारांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक खेळ्या केल्या याची सल हर्षवर्धन पाटील यांच्या गटाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे युती धर्म पाळून सुनेत्रा पवार यांचे काम करणार कि अजितदादांचा वचपा काढण्यासाठी राजकीय सारीपाट खेळणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. मावळ, शिरूर आणि इंदापूरात अजित पवारांची डोकेदुखी वाढली आहे असेच सध्या घडत असलेल्या घडामोडींवरून दिसू लागले आहे.