जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले. जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा शनिवारी 24 डिसेंबर 202 रोजी चोंडीत आमदार राम शिंदे यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार होणार आहे, या कार्यक्रमाची भाजपकडून जय्यत तयारी हाती घेण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या 11 ग्रामपंचायत निवडणुकीत तसेच मागील काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या 3 ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा समर्थकांचा नागरी सत्कार 24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता आमदार प्रा राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कर्जत – जामखेड भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात 11 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या यात 7 ग्रामपंचायतींवर भाजपाने तर एका ठिकाणी भाजपा मित्र पक्षाने झेंडा फडकावला. राष्ट्रवादीला अवघ्या तीन ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली. यापैकी दोन ग्रामपंचायतीत भाजपचे बहुमत आहे.यामुळे या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांना मतदारसंघातील जनतेने नाकारल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. आता भाजपसाठी बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने मतदारसंघातील भाजपात आणि शिंदे समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे.