जामखेडमध्ये तीन वर्षांपासून डांबराचे खड्डे मुरूमाने बुुजवण्याची योजना सुरू, तुम्ही आम्हाला झोडा पण इतर कोणालाही सोडू नका, आमदार प्रा राम शिंदेंची पत्रकार दिन सोहळ्यात तुफान फटकेबाजी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आमचं काय चुकत असेल तर आम्हाला थेेट सांगा, नसेल डायरेक्ट सांगायचं तर बातमीच्या माध्यमांतून सांगा, आम्ही त्याच्यात दुरूस्ती करू, निटनाटका कार्यक्रम करू, काही अडचण नाही, पण फक्त आमची चुकीची बाजू मांडू नका तर सगळ्यांच्याच बाजू मांडा, सगळ्यांना समान न्याय द्या, आम्हाला तुम्ही झोडा पण इतर कोणालाही सोडू नका, निर्भीड पत्रकारितेचा वसा जपा, असे अवाहन आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.
खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, आमदार प्रा राम शिंदे आणि जामखेड तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेडमध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकार स्नेह संवाद कार्यक्रमाचे 16 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे बोलत होते. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, भाजपा शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, नगरसेवक अमित चिंतामणी, रविंद्र सुरवसे, सोमनाथ पाचरणे, बापूराव ढवळे, अंकुश ढवळे, डाॅ ज्ञानेश्वर झेंडे, जामखेड मीडिया क्लबचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सचिव सत्तार शेख, अरूण वराट तसेेच सर्व पत्रकार संघटनांने तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, अडीच तीन वर्षांच्या कालखंडात प्रशासन असेल, शासन असेल, कार्यकर्ते असतील सगळी माणसं परेशान, कधी एकदाच संकट जातयं, मला सुध्दा वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर जाईल, पण मी मध्येच आलो, पक्षाने आणि नेतृत्वाने दखल घेतली, दुधात साखर पडली, आमदार तर झालोच पण मागच्या दाराने झालो, मागच्या दाराने जरी आमदार झालो असलो तरी सरकार पुढच्या दाराने आलयं, आता जामखेड तालुक्याच्या विकासाचा झंझावात पुन्हा सुरू होणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
मतदारसंघात तीन वर्षांत हेच चित्र दिसले
शिंदे पुढे म्हणाले की, लोकशाहीत पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याला कोणी नाही त्याला पत्रकार वाली असतो, ज्याची लेखणी सुंदर आहे, ज्याची लेखणी धारदार आहे, तो अन्याय अत्याचारीत, पिडीताला न्याय देऊ शकतो. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा खांब आहे, तो लोकशाहीला जाग्यावर ठेवण्याचे काम करतो, परंतू जर चौथा खांबच जर डळमळीत झाला तर मग अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. गेल्या अडीच तीन वर्षात मतदारसंघात हेच चित्र दिसले, असेही यावेळी शिंदे यांनी आवर्जून नमुद केले.
यालाच खरी पत्रकारिता म्हणतात…
लोकशाहीमध्ये कोणताही लोकप्रतिनिधी असो, आमदार असू, खासदार असू, सरपंच असु, सभापती असु, मंत्री असु, तो जर कोणाला सार्वजनिक जीवनात घाबरत असेल तर तो फक्त पत्रकाराला घाबरतो, पत्रकाराने जर वाकडं तिकडं काही लिहलं आणि ती बातमी छापून आली की मग काही खरं नाही, एखाद्या पत्रकाराच्या बातमीमुळे मंत्र्यांनाही घरी जावं लागतं, यालाच खरी पत्रकारिता म्हणतात, असे आमदार राम शिंदे म्हणाले.
तुम्हाला जाहीरात का मागावी लागते ?
तुम्हाला जाहीरात मागावी का लागते, कारण आपली लेखणी काॅपी पेस्ट झालीय, लिखाणाचा त्रास नाही, कार्यक्रमाला कोणाला बोलवत नाहीत, कार्यक्रमाला नाही बोलवले तरी सगळ्यांना बातम्या देतात, टाईप करून येतात, छापून येतात आणि चौकटीसहीत येतात आणि त्याची हेडलाईन काय याच्यासहीत येतात, मग लोकं कश्या तुमच्या बातम्या वाचतील असा सवाल यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी उपस्थित करत काॅपी पेस्ट पत्रकारांचे वाभाडे काढले.
काॅपी पेस्ट पत्रकारिता वाढीस..
सभेत बसल्यानंतर पत्रकाराने त्याच्या सदसद्विवेक बुध्दीला स्मरून त्याच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे त्याने मार्क करून कोणत्या पध्दतीचं या स्पीचमध्ये लीड केलं पाहिजे, कोणत्या स्पीचमधून पाँईट आऊट केलं पाहिजे, कोणत्या स्पीचवरती मार्मिक टोला मारला पाहिजे, हे लिहण्याची कला त्या पत्रकाराची असते, पण सध्या वेगळेच चित्र आहे. काॅपी पेस्ट पत्रकारिता वाढीस लागली आहे, त्यामुळे आपण आपली पत्रकारिता विसरून गेलो की काय ? याचा विचार होणे आवश्यक आहे, असेही यावेळी आमदार राम शिंदे म्हणाले.
…तर आम्ही पण बेभान फिरू
यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, पत्रकार म्हणून आपलं महत्व या समाज जीवनात जर राहिलं नाही तर आम्हाला सुध्दा कोणी सुचना सांगायला नाही, मार्गदर्शन सांगायला नाही, आमच्या उणिवा आणि धुणी काढायला कोणी नाही राहिलं, तर आम्ही पण बेभान फिरू, पत्रकारांचा अंकुश लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींवर असला पाहिजे, पत्रकारांची भीती जर लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये असेल तर माणूस हळूच सांगतो त्या पत्रकाराला जास्तीची जाहिरात द्या, कारण काही उलटपालटं लिहलं तर आपल्याला अवघड जाईल.
तीन वर्षांत तश्या बातम्या का लिहिल्या नाहीत ?
काही पत्रकारांनी आमच्या विरोधात खूप बातम्या लिहिल्या पण गेल्या अडीच तीन वर्षांत तश्या बातम्या का लिहिल्या नाहीत ? असा सवाल करत, पत्रकार हा स्ट्राँग असला पाहिजे, त्याची लेखणी स्ट्राँग असली पाहिजे, आपल्याकडे लक्ष वेधून घेणारी लेखणी असली पाहिजे, राज्य आणि जिल्ह्यात काय चाललयं याचं अपडेटेड ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे, लेखणीतून आपण काही गोष्टींवर अंकुश ठेऊ शकलो तर आपल्याला जाहिरात मागायची आवश्यकता नाही, घरी येऊन नाही जाहिराती दिल्या तर मग बोला, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी निर्भीड पत्रकारितेचा वसा सोडू नका असे अवाहन यावेळी बोलताना केले.
मग आम्ही काय गोट्या खेळतोत का?
आमदार शिंदे म्हणाले की, जामखेड शहरातून जाणाऱ्या हायवेचे काम केंद्र सरकारच्या निधीतून होत आहे. खासदार भाजपचा, सरकार भाजपचे, आमच्या सरकारमध्ये पण तुमचचं चालतयं, तुमच्या सरकारमध्ये पण तुमचचं चालतयं, मग आम्ही काय गोट्या खेळतोत का? असा सवाल करत आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर हल्ला चढवला.
ज्याने क्लिनचीट दिली त्यालाच सस्पेंड केला
हायवेची कामं मंजुर झाली, सगळ्यांनी बातम्या लिहिल्या, फलाण्या बिस्ताण्याच्या प्रयत्नाला यश, सगळ्यांनी लिहल्याना बातम्या, लिहिल्या का नाही, पत्र दिल्यावर जर दोन दोन हजार कोटी मंजुर झाले असते तर कोणीही पत्र दिले असते अन् निधी आणला असता, पण असं काही होत नसतं असं म्हणत शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही कसं म्हणलं, बारामती ॲग्रोची चौकशी करा, ज्यांने क्लिनचीट दिली त्यालाच सस्पेंड केला, आता का बातमी दिली नाही? माझा प्रयत्नाला यश, असे शिंदे यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली.
पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद राहणे आवश्यक
पत्रकार आणि राजकारणी यांचं नातं साप मुंगसा सारखं आहे. त्यामुळे दोघांनाही ऐकमेकांशिवाय करमत नाही. पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद राहणे आवश्यक आहे. सुसंवादाच्या माध्यमांतून विकासात्मक दृष्टीकोन ठेवणं, अपेक्षा व्यक्त करणं, तालुक्याच्या हिताच्या गोष्टी येणं, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा विनिमय होऊन त्याचं पाॅझिटिव्ह निगेटिव्ह काय केलं पाहिजे या संदर्भात चर्चा झालीच पाहिजे, असेही यावेळी शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
डांबरावरती मुरूम टाकण्याची योजना
तीन वर्षे झालं आपण खर्डा चौकातून पेट्रोलपंपापर्यंत जातो, एवढे मोठे खड्डे कधीच यापुर्वी या जामखेड शहराने बघितलेले नाहीत, त्याही पलिकडे डांबरावरती मुरूम टाकण्याची योजना यापुर्वी कधीच पाहिली नाही, गेल्या तीन वर्षांत उघड्या डोळ्याने ही योजना सर्वांनी पाहिली, डांबराचे खड्डे मुरूमाने भरण्याची योजना, पण त्यावर कोणीच लिहलं नाही, अशी खंत यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी बोलून दाखवली.
….पण तो अधिकच भारी निघाला
मिसेस सभापती आणि मी तालुकाध्यक्ष असताना जामखेडला अहिरे नावाचा तहसीलदार होता.तो अतिशय कडक शिस्तीचा होता. तो रात्री बेरात्री वाळूच्या गाड्या पकडायचा, दंड करायचा, त्याने कधी एक रूपयाचा भ्रष्टाचार केला नाही, लोकं म्हणायची, एवढा वाईट आहे ना त्यो, काही खरं नाही, पण तो जसा बदलून गेला आणि दुसरा तहसीलदार आला. आधी सगळे वैतागले होते अहिरेला, दुसरा तहसीलदार आल्यानंतर सगळी लोकं म्हणले पहिला बरा होता, कडक होता पण भोळसार होता, तसा मी भोळसार होतो, माझा कार्यक्रम केला. भोळा माणसाला, साध्या माणसाला, भारी माणूस आल्याच्या नंतर सगळ्यांना तो भारी वाटला, पण तो अधिकच भारी निघाला, तहसीलदार म्हणतोय मी, असे म्हणताच कार्यक्रमस्थळी जोरदार हशा पिकला.