जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भाजपचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून प्रवरानगर परिसरात शनिवारी देशातील पहिली सहकार परिषद (Pravaranagar Sahakar Parishad) पार पडली. या परिषदेत देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री तथा गृहमंत्री अमित शहा (Co-operation Minister Amit Shah) यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या सद्यस्थितीवर भाष्य करत जोरदार बॅटिंग केली.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले, सहकार चळवळ मागे का पडली याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. सहकाराकरिता काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास तुमच्या मदतीसाठी तयार आहे, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं.
अमित शहा पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी जिल्हा बँकांचं जाळं होतं. आज काय झालं कुठे गेल्या या बँका. घोटाळे का झाले. स्थिती काय आहे. केवळ तीनच उरल्या आहे. हजारो कोटीचे घोटाळे कसे झाले. हे काय रिझर्व्ह बँकेने केले का … नाही नाही… रिझर्व्ह बँकेने केले नाही. मी राजकीय भाष्य करायला आलो नाही. पण सहकारीता आंदोलनातील कार्यकर्त्यांना जरूर सांगेल सरकार तुमच्या सोबत आहे. मोदी तुमच्यासोबत आहेत. सहकारीता आंदोलनावर अन्याय होणार नाही. पारदर्शकता आणली पाहिजे. व्यावसायिकता आणली पाहिजे. मुलांना सहकारीतेचा मंत्र शिकवून त्यांना या आंदोलनात सहभागी करयाला पाहिजे. नव्या नेतृत्वाकडे त्याची धुरा दिली तर पुढील ५० वर्ष ही चळवळ टिकून राहील असे शहा म्हणाले.
प्रवरानगर ही सहकार क्षेत्राची काशी !
प्रवरानगर येथील भूमीचे वर्णन करताना शहा म्हणाले की, ही भूमी सहकारीता क्षेत्रात काशी एवढीच पवित्र आहे. त्याकाळात बाळासाहेब विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी सहकाराची चळवळ रोवली. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या भूमीत येऊन नतमस्तक व्हायला हवं. गुजरातमध्येही सहकार चळवळ सुरू झाली. अमूल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अमूलचा टर्न ओव्हर 50 हजार कोटींचा आहे. महाराष्ट्रात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यात चळवळ उभी केली. मोदींनी सहकारीतासाठी सहकार मंत्रालय तयार केलं. 75 वर्ष कुणालाही असं मंत्रालय करावं असं वाटलं नाही. सहकारीता आजही प्रासंगिक आहे. सबका साथ आणि सबका विकासचा मंत्र केवळ सहकारीतेतूनच होऊ शकतो हे माहीत आहे म्हणूनच मोदींनी हे मंत्रालय तयार केलं, असंही अमित शहा म्हणाले.