जामखेड : ‘स्वता:च्या नावासाठी कार्यकर्त्यांचा बळी देणारा मी कार्यकर्ता नाही,’ “तुम्ही मला साथ द्या, तुमच्यासाठी मी माझ्या रक्ताचा थेंब न् थेंब दिल्याशिवाय राहणार नाही,” ‘भरपावसात आमदार राम शिंदेंची भावनिक साद’
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । तुमच्या जीवाभावाचा, आपला, आपल्यातला माणूस,स्वाभिमान जागृत करणारा, येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणारा,आपली ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारा कार्यकर्ता तुम्ही निर्माण केला.आमदार म्हणून पाहिलाय,मंत्री म्हणून पाहिलाय,या काळात मी अनेक लोकांना समर्थन देण्याचा प्रयत्न केला.त्यातील काही लोकांनी माझा विश्वासघात केला.पण जनतेने माझा कधीच विश्वासघात केला नाही.जनता माझ्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभी राहिली आहे.यंदाच्या बाजार समिती निवडणुकीत नेहमीप्रमाणे जनतेचे भरभरून प्रेम आणि आशिर्वाद मिळेल यात तिळमात्र शंका नाही.जामखेड बाजार समितीवर स्वाभिमान शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा ठाम विश्वास आमदार प्रा.राम शिंदे यांनी भर पावसात पार पडलेल्या सभेत व्यक्त केला.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष प्रणित जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल जामखेड बाजार समितीची निवडणूक लढवत आहे. या पॅनलची प्रचारसभा बुधवारी सायंकाळी जवळा गटात पार पडली. डिसलेवाडी येथे या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी रत्नापुरचे माजी सरपंच दादासाहेब वारे हे होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी सर्व 18 उमेदवारांची उपस्थितांना ओळख करून दिली.
आमदार प्रा.राम शिंदे यांचे भाषण सुरू होताच विजांच्या कडकडाटासह पावसास सुरूवात झाली. भरपावसात आमदार राम शिंदे यांनी पाॅवरफुल भाषण केले. या भाषणातून त्यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. दरम्यान आमदार राम शिंदे यांच्या भाषणाआधी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांनी बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देत असल्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
आमदार प्रा.राम शिंदे यांचे भाषण सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत पावसास सुरूवात झाली. भरपावसात आमदार शिंदेंनी तुफान बॅटिंग केली. यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, यंदा होत असलेल्या जामखेड बाजार समिती निवडणूकीत जामखेड तालुक्यातील जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत होत असताना दिसतोय, जामखेड बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आपल्या उमेदवारांनी एका दिशेनं, एका विचारानं संपुर्ण तालुका पिंजून काढलाय, आपल्या पॅनलकडून ठिकठिकाणी सभा होत आहेत. विरोधकांनी सुध्दा आपल्यासारखा प्रयत्न केला, परंतू विरोधकांच्या सभेकडे जनतेने आणि मतदारांनी सपशेल पाठ फिरवल्यामुळे त्यांनी हा नादच सोडून दिला, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली.
शिंदे पुढे म्हणाले की, बाहेरून आलेल्या नेतृत्वाने सातत्याने लोकांना फसवण्याची भूमिका पार पाडली. ही भूमिका पार पाडत असताना या तालुक्याला कोण वाली आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण काळजी करायचं कारण नाही, तुमच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. स्वता:च्या नावासाठी कार्यकर्त्यांचा बळी देणारा मी कार्यकर्ता नाही, कार्यकर्त्यांचा मान सन्मान करणारा मी कार्यकर्ताय, येणाऱ्या कालखंडात तुम्ही मला साथ द्या, तुमच्यासाठी मी माझ्या जीवाचं अन रक्ताचं थेंब ना थेंब दिल्याशिवाय राहणार नाही, अशी भावनिक साद त्यांनी उपस्थितांना घातली.
आमदार राम शिंदे म्हणाले की,मागील कालखंडामध्ये आपण आपल्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली. अडीच वर्षानंतर विधानपरिषदेचा आमदार झाल्यापासून मतदारसंघात विकास कामांचा झंझावात सुरू केला आहे.विकासाच्या माध्यमांतून आपण जे जे कामं केली, त्यामाध्यमांतून खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास संपादन करू शकलो. एवढ्या रात्री, एवढ्या मोठ्या संख्येने, एका गटाचे, इतके मोठे लोकं जमणं हे देखील नेतृत्वावरती, पक्षावरती, कार्यकर्त्यांवरती असलेला विश्वास आपण यानिमित्ताने दाखवून दिला त्याबद्दल उपस्थित सर्वांचे मनापासून आभार!
आपण ज्यावेळेस फक्राबादहून डिसलेवाडीकडे येतो त्यावेळेस एक ओढा लागतो त्यावर आपण जलयुक्त शिवार योजनेतून काम केलं होतं, पण नंतर देखील तो ओढा उकरण्यात आला. यासाठी फक्राबादच्या लोकांनी बरीच वर्गणी केली. वर्गणी फक्राबादची अन मशिन बारामतीचं, शेजारी कुसडगाव असून सुध्दा त्यांची मशीन लावली नाही आणि राजेंद्र कोठारींचा पेट्रोल पंप असताना देखील डिझेल बारामतीहून आणलं, ही परिस्थिती गेल्या अडीच तीन वर्षांची आहे, असे सांगत आमदार राम शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
पडत्या पावसात उभा राहून मी तुमच्यावरती छत्री धरण्याचं मी काम केलयं, ही छत्री आपल्याला विकासाकडे घेऊन जाणारी आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या ‘छत्री’ या चिन्हाला भरभरून पाठिंबा द्या, सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे अवाहन यावेळी आमदार राम शिंदे यांनी केले.
यावेळी भाजपा कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे, भाजपा तालुकाध्यक्ष अजयदादा काशिद, माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले,पांडुरंग उबाळे, लहू शिंदे,ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे,राहुल उगले,बापुराव ढवळे, मनोज कुलकर्णी, प्रविणशेठ चोरडिया, डाॅ झेंडे, सोमनाथ राळेभात, बंकटराव बारवकर, मनोज राजगुरू, दयानंद कथले सह आदी प्रमुख पदाधिकारी तसेच जवळा जिल्हा परिषद गटातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.