जामखेड : राष्ट्रवादीतील अनेक जण परतीच्या वाटेवर, खासदार सुजय विखेंच्या गौप्यस्फोटाने कर्जत-जामखेड मतदारसंघात राजकीय खळबळ, पत्रकारांनी जामखेड तालुक्याची सत्य वस्तुस्थिती निर्भीडपणे मांडावी – खासदार डॉ.सुजय विखे-पाटील
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । पत्रकारितेमध्ये अर्थकारणाची जोड ही काळाची गरज बनली आहे, कारण प्रत्येक पत्रकार हा उपजीविकेचे साधन म्हणून पत्रकारिता हा व्यवसाय निवडतो.समाजाला जागृत करण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमांतून होत असते,सध्या काळ बदललाय, वेेळ बदललीय, तशी परिस्थिती बदलली आहे. आमदार राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कर्जत-जामखेड मतदारसंघात जी काही विकास कामं होणार आहेत, त्या माध्यमांतून भरघोस अशी मदत आणि ताकद प्रत्येक पत्रकाराला दिली जाईल, प्रत्येकाला न्याय दिला जाईल. आमच्याकडून काही मदत झाली तर आमच्याबद्दल चांगलं छापा अशी आमची अपेक्षा नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी जामखेड येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात बोलताना मांडली.
यावेळी बोलताना खासदार डॉ.सुजय विखे-पाटील म्हणाले की,गेल्या अडीच वर्षांत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना होणारा त्रास, एक छोटीसी जरी जाहिरात त्याने एखाद्या पत्रकाराला द्यायचा प्रयत्न केला, तर त्याच्या दुकानावर धाडी, त्याचं क्रशर बंद, त्याची गाडी जप्त, त्याचा कोणी सरकारी नातेवाईक असेल तर तेथून त्याला निरोप दे, अश्या प्रकारचे वेगवेगळे प्रयोग वापरल्यानंतर मागच्या अडीच वर्षात कर्जत आणि जामखेड तालुक्यातला भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी हा भयभीत होता, आणि या भयभीत वातावरणामध्ये त्या ठिकाणी पत्रकाराला म्हणावा तसा न्याय देण्यामध्ये आमचा कार्यकर्ता कमी पडला. पण यापुढे असं होणार नाही, असेही विखे यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांवर सुजय विखेंचा जोरदार निशाणा
मागच्या अडीच वर्षांत अहमदनगर जिल्ह्यात आणि कर्जत जामखेड मतदारसंघात पत्रकारितेच्या माध्यमांतून ज्या गोष्टी किंवा जे सत्य बाहेर यायला पाहिजे होतं ते दाबण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकप्रतिनिधींनी केला, त्यामध्ये पत्रकारांनी नाईलाजाने अनेक असे सत्य समोर आणले गेले पाहिजे होते ते आणले गेले नाही, असे म्हणत खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी आमदार रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला.
आमदार राम शिंदे साहेबांना समांतर श्रेय होतं असं वाक्य पत्रकारांनी टाकलं नाही ही आमची खंत
जेवढ्या कामांचे मधल्या काळात भूमिपूजनं झाले ते सगळे राम शिंदे साहेबांनी मंजुर केेेेलेले कामं होते, त्याचा कुठलाही उल्लेख पत्रकारितेच्या माध्यमांतून झाला नाही, जामखेड नगरपालिका असेल, जामखेड तालुक्यातील रस्त्यांची कामं असतील, जामखेड तालुक्यातून जाणारे नॅशनल हायवेची कामं असतील, पालकमंत्री असताना शिंदे साहेबांच्या काळात मंजुर झालेली कामं असतील, त्याची उद्घाटन दुसऱ्याच माणसाने केले त्याच्याबद्दल कोणी उल्लेख केला नाही, जामखेड पाणी पुरवठा योजनेची मुळ संकल्पना, मुळ डिपीआर, मुळ प्रशासकीय मान्यता आमदार राम शिंदे साहेबांनी मंत्री असताना घेतली. त्या ठिकाणी दुसरा लोकप्रतिनिधी श्रेय घेत असताना आमदार राम शिंदे साहेबांनाही तेवढेच समांतर श्रेय होतं असं वाक्य पत्रकारांनी टाकलं नाही, याची खंत आमच्या मनामध्येही आहे, असे खासदार डॉ.सुजय विखे-पाटील म्हणाले.
शरद पवार मुख्यमंत्री होते तरी अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांनी सत्तेची भीती न बाळगता…
उगीच 50 वर्षे अहमदनगर जिल्हा सामाजिक प्रश्नांवर, शेतीच्या प्रश्नांवर, संघर्षाच्या प्रश्नांवर एवढा मोठा झाला नाही, यामध्ये अनेक नेते या तालुक्याला आणि जिल्ह्याला लाभले आहेत, पण मी माझ्या आजोबांचं उदाहरण यासाठी देतो की मी त्यांच्या सानिध्यात राजकारण केलं आहे. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळात असलेली पत्रकारिता, त्या पत्रकारितेची असलेली उंची, पत्रकारांनी बाळासाहेब विखेंवरही टीका केली, पण टीका करताना जेव्हा बाळासाहेब विखेंनी चांगलं काम केलं तेवढ्याच निर्भीडपणे सरकार कोणाच असेल, पवारांचा विखेंशी संघर्ष होता, पवार जरी मुख्यमंत्री होते तरी अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांनी खंबीरपणे सत्तेची भीती न बाळगता अहमदनगर जिल्ह्याचे प्रश्न आणि बाळासाहेब विखेंची भूमिका निर्भीडपणे मांडली. त्या कालावधीचा पत्रकार विचार करत नव्हता की आज यांच्याबद्दल लिहलं तर काय होईल? पण आज परिस्थिती बदलली आहे. परंतू आता पत्रकारितेच्या माध्यमांतून जामखेडच्या पत्रकारांनी फक्त सत्य आणि वास्तव मांडणी जनतेसमोर करावी हीच आमची अपेक्षा आहे, असे सांगत खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी बदलेल्या पत्रकारितेवर रोखठोक भाष्य केले.
जामखेड तालुक्यात 30 कोटींपेक्षा अधिकचे कामे मार्गी
ज्याचं कामं त्याचं श्रेय आहेच, आज एखादी बिल्डींग विद्यमान आमदाराच्या माध्यमांतून होत असेल तर आनंदच आहे, त्याच्याबद्दल तुम्ही लिहा पण जे काम आमदार रामजी शिंदे साहेबांच्या माध्यमांतून झाले आहेत तेही लिहा. असे सांगत विखे पुढे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून एकट्या जामखेड तालुक्यात 30 कोटींपेक्षा अधिकचे कामे मार्गी लागले आहेत, असे विखे म्हणाले.
राष्ट्रवादीतील अनेक जण परतीच्या वाटेवर
मागच्या अडीच तीन वर्षांत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना त्रास झाला, अनेक प्रवेश झाले, सत्तांतरं करण्यात आली, जिल्हा परिषद सदस्य असतील, सरपंच असतील, आज जेवढे लोकं मागच्या अडीच वर्षांत राष्ट्रवादीत गेले आज सत्तांतर झाल्यानंतर त्यापैकी 90 टक्के लोकं रामजी शिंदे साहेबांच्या संपर्कात आले आहेत ते आता पुन्हा पक्षात परत येण्याच्या तयारीत आहेत, कारण राजकारणात दबावाने, प्रशासनाचा वापर करून केली गेलेले प्रवेश हे फक्त शारीरिक असतात मनस्वी नाही, जरी लोकं शरिराने राष्ट्रवादीत गेले होते तरी ते मनाने भाजप सोबत होते. आता आपलं सरकार आल्यामुळे ते सर्व लोकं परतीच्या वाटेवर आहेत, असा गौप्यस्फोट यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी यावेळी बोलताना केला.
जामखेड तालुक्याची जी वस्तुस्थिती आहे ती निर्भिडपणे मांडावी
आज जी परिस्थिती आमदारावर, खासदारांवर आहे तीच परिस्थिती उद्या नागरिक या नात्याने, पत्रकार या नात्याने तुमच्यावर सुध्दा येण्याची वेळ येऊ शकते हे विसरून चालणार नाही, असे सांगत सुजय विखे म्हणाले की, पत्रकारितेच्या माध्यमांतून निर्भीडपणे तालुक्याची जी वस्तुस्थिती आहे ती मांडावी, आम्ही चुकत असलो तर तुमचा पुर्ण अधिकार आहे आम्हाला आमची चुक दाखवण्याचा, शिंदे साहेेब असो किंवा मी चुकत असेल तर त्याची नक्कीच बातमी झाली पाहिजे, त्याच्यावर टीका टिप्पणी केलीच पाहिजे, पण मागच्या अडीच वर्षामध्ये खासदार आणि माजी आमदार यांनी केलेल्या कामांचे श्रेय आम्हाला आहे असे पत्रकारितेच्या माध्यमांतून आम्हाला कधी वाचण्यात आलं नाही, अशी खंत यावेळी विखे यांनी बोलून दाखवली.
सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा पत्रकारांकडून अधिक
आम्ही रात्रंदिवस एक करून, मिटींगा घेऊन जामखेड – सौताडा रस्ता असेल, आढळगाव ते जामखेड रस्ता असेल, या कामाचे श्रेय योग्य त्या माणसाला दिलं गेलं नाही, ही आमच्या मनामध्ये खंत आहे. भविष्यात वाटचाल करत असताना आमची पत्रकारांकडून एकच अपेक्षा आहे की, आपल्यामुळे आज हा जिल्हा, हा तालुका, या तालुक्यात असणारे नागरिक, शेतकरी यांची अपेक्षा लोकप्रतिनिधीपेक्षा, आमदारापेक्षा, खासदारापेक्षा, सरपंचापेक्षा, जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा, सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा पत्रकारांकडून अधिक आहे. अनेक प्रश्नांवर पत्रकार चर्चा घडवून आणू शकतात, असे सांगत विखे यांनी पत्रकारांचे समाजातील महत्व विषद केले.
सुजय विखे म्हणून कोणी मतदान टाकत नाही, तर…
2024 निवडणूक आणि देशाचं पंतप्रधान कोण असेल हे लोकांनी आधीच ठरवलेलं आहे. उमेदवार सुजय विखे असो किंवा नसो, पण देशातील जनतेने ठरवलयं की पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार, त्यामुळे सुजय विखे आहे नाही हा प्रश्न दुय्यम आहे. जर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होण्यापासून कोणी थांबवू शकत नाहीत तर आम्ही पण त्या लाईनमध्ये धक्का स्टार्ट म्हणून आम्हालाही लोक धक्का देणार ना, सुजय विखे म्हणून कोणी मतदान टाकत नाही, तर नरेंद्र मोदी आहे म्हणून मतदान पडतं, त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमांतून केलेली प्रत्येक विकास कामं प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचली आहे. विकासात्मक कामांची मांडणी करत असताना सामाजिक प्रश्नांचीही मांडणी करणं ही पत्रकारांची जबाबदारी आहे, ही जबाबदारी पत्रकारांनी पार पाडावी असे अवाहन यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी केले.