जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। सध्या सर्वत्र दीपोत्सवाची जोरदार धूम सुरू आहे. दिवाळी फराळाचे कार्यक्रम जोरात होऊ लागले आहे. सध्या राजकीय फराळाची धूम सुरू झाली आहे. यामाध्यमांतून कार्यकर्त्यांच्या भेटीतून नेतेमंडळी गावगाड्याची राजकीय हवेचा मागोवा घेऊ लागले आहेत.अश्यातच शनिवारी जवळेकरांनी चौंडीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
कर्जत – जामखेड मतदारसंघात सध्या राजकीय फराळाची खमंग धूम सुरू आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी दिवाळी फराळाचे आयोजन आज करण्यात आले आहे. सकाळपासूनच चौंडीत गावोगावचे कार्यकर्ते दाखल होऊ लागले आहेत.
राम शिंदे हे मंत्री असताना जिल्ह्याच्या राजकारणात चौंडीला विशेष महत्व होते. चौंडीत नेहमी जिल्ह्यासह राज्यातील नेते, कार्यकर्ते, अधिकारी यांची वर्दळ असायची. मात्र राम शिंदे यांच्या पराभवानंतर चौंडीत होणारी गर्दी रोडावली होती. त्यातच मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे चौंडी सुनीसुनी झाली होते. मात्र चौंडीत फक्त मोजक्याच कार्यकर्त्यांची वर्दळ असायची.
कोरोना महामारीची लाट ओसरल्यानंतर आता सर्व पूर्वपदावर आले आहे. राजकीय – सामाजिक कार्यक्रम जोरात होऊ लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या गर्दीने नेहमी फुलणारी चौंडी यंदा पुन्हा फुलली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी सकाळपासून कार्यकर्ते मोठ्या संख्येने चौंडीत दाखल होऊ लागले आहेत. यात सर्वाधिक लक्ष वेधले ते जवळा ग्रामस्थांनी.
जवळा आणि राम शिंदे हे अतूट समिकरण नेहमी पहायला मिळते.ते आज पुन्हा एकदा अधोरेखित झाले. जवळा येथील सर्व समाज घटकातील कार्यकर्ते व नागरिकांनी चौंडीच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी जवळेकरांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्याशी संवाद साधला.जवळेकरांनी केलेले शक्तीप्रदर्शन तालुक्याच्या राजकारणात चर्चेत आले आहे. यावेळी जवळा गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राम शिंदे यांच्या कर्जत शहरातील संपर्क कार्यालयाचे कालच उद्घाटन झाले. भरपावसात झालेल्या कार्यक्रमाची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. त्यातच आज चौंडीत दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या निमित्ताने चौंडीत राम शिंदेंच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांची वाढलेली गर्दी बदलत्या हवेची तर ही चाहूल नाही ना ? अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
First Publisher : jamkhedtimes.com
Web Title : Jawalekar strong show of strength Choundi flourished again with the crowd of activists
वेब शिर्षक : जवळेकरांचे चौंडीत जोरदार शक्तिप्रदर्शन : कार्यकर्त्यांच्या गर्दीने पुन्हा फुलली चौंडी