मतदान यंत्रांच्या सुरक्षेवरून कर्जत भाजप झाली आक्रमक 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधी कर्जतमध्ये कोण बाजी मारणार? यावर आकडेमोडीला वेग आला आहे. सोशल मिडीयावर दावे प्रतिदावे सुरू आहेत. अश्यातच भाजपने मतदान यंत्रांच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडे प्रशासनाचे गुरूवारी लक्ष वेधले. यामुळे पुन्हा एकदा कर्जतचे वातावरण तापले आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा थेट सामना रंगला होता.निवडणूकीत अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. चुरशीच्या वातावरणात 21 रोजी मतदान पार पडले. 80% मतदान झाले. वाढलेल्या मतांचा टक्का कुणाला तारणार ? कुणाला धक्का देणार ? यावर आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.

दरम्यान गुरूवारी 23 रोजी कर्जत भाजपने मतदान यंत्रांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कर्जत नगरपंचायतीची निवडणुक जाहीर झाल्यापासुन उमेदवारी अर्ज भरणे, काढणे व इतर सर्व कार्यक्रमात प्रशासनावर लोकप्रतिनिधी व ठराविक कार्यकर्त्यांचा असणारा दबाव, दडपशाही व झालेली दादागिरी पाहता तसेच निवडणुक चालु झालेली असताना प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार निता अजिनाथ कचरे व पुजा अनिल कचरे यांचा उमेदवारी अर्ज प्रशासनाला हाताशी धरुन दबाव तंत्राने काढण्यात आला.

Karjat BJP became aggressive due to security of voting machine

तसेच प्रभाग क्रमांक 14 मधील उमेदवार शिबा तारेक सय्यद यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करुन व आदर्श आचारसंहीतेचे भंग करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला दिलेला अनपेक्षित पाठिंबा या सर्व घडामोडी पाहता आमचा प्रशासनावर अजिबात विश्वास राहीलेला नाही असा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की,मतदान झाल्यानंतर सील झालेली मतदान यंत्रे किती सुरक्षित ठेवली आहेत ? त्यासाठी किती सी. सी. टी व्ही कॅमेरे लावले आहेत ? व त्यासाठी लावण्यात आलेली सुरक्षा कशी आहे ? याची संपुर्ण माहिती मिळावी अशी मागणी करत प्रशासनाने मतदान यंत्रांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती माध्यमांवर जाहीर करावी तसेच सर्व यंत्रणेवर प्रशासनाने कडक लक्ष ठेवावे अशी मागणी कर्जत भाजपने निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे.

Karjat BJP became aggressive due to security of voting machine

निवेदनावर सचिन सखाराम पोटरे, अश्विनी सोमनाथ गायकवाड, गणेश नवनाथ क्षिरसागर, बबनराव सदाशिव लाढाणे, उमेश शंकर जपे, मोनिका अनिल गदादे, मोहिनी दत्तात्रय पिसाळ, शरद रामभाऊ म्हेत्रे, वनिता परशुराम शिंदे, संजय शाहुराव भैलुमे, सुवर्णा विशाल काकडे, अनिल मारुती गदादे, धनंजय दादासाहेब आगम  सह आदींच्या सह्या आहेत.