जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | राज्यात कर्जत नगरपंचायत निवडणूक विविध कारणांनी गाजत आहे. या निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. प्रदेश भाजपने अचारसंहिता भंगाची तक्रार करत प्रभाग 14 मधील निवडणुक रद्द करण्याची मागणी राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांच्याकडे केली आहे अशी पोस्ट राम शिंदे यांनी फेसबुकवर केली आहे.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा थेट सामना रंगला आहे. या निवडणुकीत आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. या निवडणुकीत आमदार रोहित पवार गटाकडून दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून प्रचारात करण्यात आला होता. परंतू भाजपने आता आमदार रोहित पवार यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे अचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. यासंबंधीची एक पोस्ट माजी मंत्री राम शिंदे यांनी फेसबुकवर केली आहे. या पोस्टमध्ये निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचे पत्र आहे.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या 21 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. परंतू मतदानाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्याविरोधात तक्रार करण्याबरोबरच प्रभाग 14 ची निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी आज 20 रोजी राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार शिबा तारेक सय्यद यांची प्रचारसभा प्रा. राम शिंदे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता घेतली होती आणि त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजता शिबा सय्यद यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
तसेच कर्जत नगरपंचायत निवडणूकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपाच्या उमेदवारांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रभावित करुन उमेदवारी मागे घेण्याबाबत स्थानिक आमदार रोहित पवार यांनी जबरदस्तीने व सत्तेचा दबाव टाकून बळी पाडले आहे, बाब निंदनीय असून निवडणुकीत राजकीय दबावतंत्राचा वापर करुन व दहशत निर्माण करून भाजपाच्या उमेदवारांना संभ्रमित करण्याचा डाव आमदार रोहित पवार यांनी आखला आहे.
आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी / कार्यकर्त्याकडून नगरपंचायत निवडणुकीतील भाजपा उमेदवारांना प्रलोभन दाखवून जबरदस्तीने पक्षांतर करण्यास भाग पाडणे, सत्तेचा दबाव टाकून मतदारसंघात दहशत निर्माण करणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्या असून त्यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचा उघड-उघड भंग झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
निवडणुक आचारसंहितेच्या कालावधीत आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरिता व असे प्रकार प्रत्यक्षदर्शनी उघड झाले असल्याने वार्ड क्र. १४ कर्जत नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी मुकुंद कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दरम्यान राज्य निवडणूक आयोग भाजपने दाखल केलेल्या तक्रारीवर काय निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.