खंडोबाच्या साक्षीने आमदार राम शिंदे व निलेश लंकेंचा एल्गार, लोकसभा निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांचे ‘ते’ सुचक वक्तव्य राज्यात चर्चेत !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मी व आमदार लंके (Nilesh Lanke MLA) सर्वसामान्य माणसे आहोत. ग्रामीण भागात राहणारे आहोत. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी महायुतीत आम्ही एकत्र आहोत. आमची आधीपासून मैत्री आहे. मात्र, आम्ही एकत्र आलो तर चर्चा होते व अशी चर्चा झाली पाहिजे. आम्ही दोघांनी आज खंडोबारायाचे दर्शन घेतले व सदानंदाचा यळकोट म्हणत जागर केला. देवाची आरती केली व तळीही उचलली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आता ‘रामराज्य’ येणार आहे, काळजी करायचं कारण नाही, असे सांगत आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde MLA) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत सुचक वक्तव्य केले. शिंदे यांनी केलेले वक्तव्य आता राज्यात चर्चेत आले आहे.
आमदार प्रा.राम शिंदे 26 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौर्यात त्यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या समवेत कोरठण खंडोबा येथील खंडोबा यात्रेस भेट दिली. यावेळी आमदार शिंदे व लंके यांनी एकत्रितपणे खंडोबारायाचे दर्शन घेतले. यावेळी दोघा नेत्यांनी खंडोबारायाची आरती केली. तळी उचलली. सदानंदांचा येळकोटचा गजर करत जागर केला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार शिंदे व लंके यांनी केलेले वक्तव्य राज्यात चर्चेत आले आहे.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले, आम्ही दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. एकमेकांविषयी आत्मीयता व प्रेम आहे. मोहटादेवीला जाताना योगायोगाने मी आमदार शिंदे यांच्या गाडीचा चालक म्हणजे सारथी झालो व आता देशात रामराज्य आले असल्याने नगर जिल्ह्यातही ‘रामराज्य’ यावे व त्या रामराज्याचा मी सारथी असावे, अशी प्रार्थना खंडेरायाकडे केली आहे, असे म्हणत लंके यांनी सुचक विधान केले.
लंके पुढे म्हणाले, माझ्या राजकीय जीवनातील अडचणीच्या वेळी शिंदे यांनी मला मदत केली, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. मला डॉक्टरेट मिळाल्यावर अन्य कुणाला डॉक्टरेट वा अन्य काही मिळाले, त्याबद्दल मला बोलायचे नाही. मी डॉक्टर झालो तरी ऑपरेशन करू शकणार नाही. मात्र, वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया मला करता येईल, असेही आमदार लंके यांनी स्पष्ट केले. आमदार लंके यांनी राजकीय शस्त्रक्रिया करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे स्पष्ट केल्याने त्यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांत जोरदार राजकीय हालचाली वाढल्या आहेत. विशेषता: महायुतीत जोरदार हालचाली सुरु आहेत. विद्यमान खासदार डाॅ सुजय विखे पाटील यांची उमेदवारी फिक्स असल्याचे विखे समर्थकांचे म्हणणे आहे परंतू गेल्या काही दिवसांपासून विखेंना पक्षातून मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत विरोध होत आहे. त्यातच माजी पालकमंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी भाजपकडे लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आमदार शिंदे यांनी लोकसभेची जोरदार तयारी हाती घेतली आहे. शिंदे यांच्याशिवाय महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही लोकसभेची तयारी हाती घेतली आहे. लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली त्यांनी हाती घेतल्या आहेत. पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवणार असा इरादा राणी लंके यांनी जाहीर केला आहे.
पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा यात्रेनिमित्त खंडोबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या घाटात शुक्रवारी बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात रंगल्या. आमदार शिंदे व आमदार लंके यांनी या शर्यतींच्या वेळी हजेरी लावून बैलजोड्या घेऊन शर्यतीत सहभागी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले व शर्यतींचा आनंद लुटला. त्यानंतर त्यांनी खंडोबा मंदिरात येऊन दर्शन घेतले.
यावेळी बोलताना आमदार लंके यांनी बैलगाडा शर्यतीचा किस्सा सांगितला. या शर्यतीत विविध बैलजोड्या गाड्याला जोडल्या गेल्या होत्या. मात्र, त्यापैकी कुणालाही यश मिळाले नाही. मात्र, मी व आमदार शिंदे यांनी ज्या गाड्याला बैलजोडी जुंपली, ती जोडी गाड्यासह इतकी जोमात पळाली, की अवघ्या 11 सेकंदांत ती घाटाचा राजा ठरली, असे ते म्हणताच जोरदार हास्यकल्लोळ उडाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली, यामुळे देशात रामराज्य आले आहे. अशाच पद्धतीने नगर जिल्ह्यातही आता ‘रामराज्य’ येणार आहे, असे सूचक भाष्य जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी प्रजासत्ताकदिनी पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा येथे बोलताना केले.
आमदार प्रा.राम शिंदे व आमदार निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची गोळाबेरीज करण्यासाठी सरसावले आहेत. खासदार विखे विरोधक म्हणून त्यांना राजकीय वर्तुळात ओळखले जाते. महायुतीतील दोन्ही आमदारांनी खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी आपल्या पक्षाकडे उमेदवारीचा दावा ठोकला आहे.शिंदे व लंके यांनी खासदारकीची तयारी हाती घेतल्याने खासदार विखेंच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
अहमदनगर दक्षिणेत पक्षाला चांगले वातावरण आहे परंतू विखेंविरोधात नेत्यांसह गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचा रिपोर्ट भाजपा हायकमांडला गेला असल्याचे बोलले जात आहे. एकुणच लोकसभेचा सामना विखेंना जड तर ठरणार नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे.विखे यांनी मागच्या काळात केलेल्या राजकीय खेळ्या आता त्यांना अडचणीच्या ठरू लागल्या आहेत, अशी चर्चा आता अहमदनगर जिल्ह्यात रंगली आहे.
(Edited by : sattar shaikh )