पुणे – Kirit Somaiya Video | पुणे महापालिकेमध्ये आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली. सोमय्या महापालिकेत आले असता त्यांना निवेदन देण्यासाठी काही शिवसैनिक त्याठिकाणी आले होते.त्यावेळीच ही घटना घडली. यात सोमय्या जखमी झाल्याचे समजत आहे.
धक्काबुक्कीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून यामध्ये धक्काबुक्कीमुळे सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवरून खाली कोसळल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर सोमय्या यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आले आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर याबाबतची माहिती स्वतः सोमय्या यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. याबाबत माहिती देताना सोमय्या यांनी, ‘शिवसेनेच्या गुंडांनी आज माझ्यावर पुणे माहापालिकेमध्ये हल्ला केला.’ अशी माहिती दिली.
या प्रकरणानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेचा निषेध करताना, ‘आम्ही जशास तसे उत्तर देऊ’ असा इशारा दिला. सोमय्या यांना पुण्यातील संचेती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्या विविध चाचण्या करण्यात येत आहेत, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
मारहाण झाल्यानंतर सोमय्या यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. सोमय्या यांच्या माकड हाडाला मार लागला आहे. त्यांची स्थिती प्रकृती स्थिर आहे. त्यांचा रक्तदाब वाढला होता. पण आता काळजीचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.
दरम्यान माकड हाडाला दुखापत असून त्यांना आरामाची गरज आहे. एक दिवस रुग्णालयात राहावं लागेल. उद्या सुट्टी होईल, असंही डॉक्टरांनी म्हटलं.