मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी एलन मस्क यांची भेट घेतली. या भेटीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदींना गुजरात ऐवजी महाराष्ट्रात उद्योग आणवेत अशी विनंती करणारं ट्विट केलं. त्यावर भाजपच्या जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी रोहीत पवारांवर हल्लाबोल केला आहे.
भाजपच्या जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहीत पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, नामांकित उद्योजकांच्या घराजवळ जिलेटीन ठेवले की, राज्यात उद्योग वाढतात हे खरं आहे का? असा सवाल करत त्यांनी रोहित पवारांना टॅग केले आहे. तसेच त्यांनी असं देखील विचारलं की, वसुली सरकारने किती प्रकल्प आणले महाराष्ट्रात? असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. पंतप्रधानांना सल्ले देण्याआधी स्वतःची पात्रता बघावी. मोदीजींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था जगात 5 व्या क्रमांकावर आहे, असे म्हणत त्यांनी पवारांवर तोफ डागली.
राज्यात देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करताना त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांच्या कर्तृत्वाने FDI मध्ये महाराष्ट्र १ नंबरवर आला. अरे बाबा, मोदीजी देश चालवतायत, फक्त साडेतीन जिल्हे नाही. अशी खोचक टीका मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे.