चोंडीतील सभेसाठी गोपीचंद पडळकर आक्रमक : पडळकरांनी केली इतिहास जागर यात्रेची घोषणा, चोंडीत होणार सांगता !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. चौंडीत 31 मे रोजी सभा घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. प्रशासन या सभेला परवानगी देणार का ? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासुन जयंती उत्सव साजरा झाला नव्हता. यंदाचा जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने रोहित पवारांकडून जंगी नियोजन सुरू आहे.
एकिकडे स्थानिक आमदार रोहित पवारांकडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाची जय्यत तयारी केली जात असतानाच दुसरीकडे पवार कुटुंबियांवर सातत्याने जहरी टीका करण्यासाठी प्रसिध्द असलेले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी चोंडीत येणाऱ्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे सभेची परवानगी मागितली आहे.
31 रोजी शरद पवारांसह अनेक मंत्री चोंडीत
31 मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे, मंत्री अमित देशमुख सह आदी मंत्री चोंडीत दाखल होणार आहेत, त्यापार्श्वभुमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना सभेसाठी प्रशासन परवानगी देणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चोंडीतील सभेला परवानगी द्या – पडळकर
दरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हिंदू संस्कृतीच्या जिर्णोध्दारकर्त्या, कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31मे रोजी चोंडीत दिमाखात साजरी केली जाते, येथील जयंतीचा कार्यक्रम सर्वपक्षीय, सर्व जाती धर्माच्या लोकांचा असतो, लाखो लोक अभिवादन करण्यासाठी इथे येत असतात, ह्या वर्षीसुध्दा लाखो लोक इथे येणार असुन या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी सभेचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासन पडळकरांच्या सभेला परवानगी देणार का ? याकडे राज्याचं लक्ष
आमदार गोपीचंद पडळकरांनी सभेची परवानगी द्यावी असे पत्र 19 मे रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना पाठवले आहे. तशी तारीख पडळकर यांच्या पत्रावर नमुद आहे, पडळकर यांच्या नियोजित सभेला अहमदनगर जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली की नाही याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या सोशल मिडीयावर गोपीचंद पडळकर यांच्या नावाचे पत्र वायरल झाले आहे. जिल्हा प्रशासन पडळकरांच्या सभेला परवानगी देणार का ? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
प्रशासनाने पवारांच्या दबावाखाली काम करु नये – पडळकर
दरम्यान जामखेड टाईम्सशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी 2004 पासून जयंतीच्या कार्यक्रमाला असतो, त्यामुळे पवारांनी जास्त नाटक करु नये, शरद पवार एकदाही जयंतीच्या कार्यक्रमाला आलेले नाहीत, प्रशासनाने पवारांच्या दबावाखाली काम करु नये. अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न पवार कुटुंब करतयं, ते आम्ही खपवून घेणार नाही. महाराष्ट्रातील लाखो लोक अभिवादन करण्यासाठी येतील आणि जयंतीचा उत्सव थाटामाटात साजरा होईल असे यावेळी पडळकर म्हणाले.
इतिहास जागर यात्रेची घोषणा
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी इतिहास जागर यात्रेची आज घोषणा केली आहे. त्यांनी यासंबंधी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, समस्त बहुजन समाजाला आपल्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी मी वाफगाव ते चौंडी (२९ मे ते ३१ मे ) इतिहास जागर यात्रा करणार आहे. त्याची सांगता ३१ मे रोजी चौंडीला आपल्या साक्षीने करणार आहे. चला करूया जागर अहिल्यादेवी युगाचा, जागर पराक्रमी इतिहासाचा…
जय मल्हार…जय अहिल्या