जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । 25 वर्षे तुकाई चारीचं काम लोकं मागत होते, ते काम मी मंजुर केलं, ज्या 22 गावात पाणी न्यायचं ठरवलयं त्यातील एकाही गावात 2019 ला मी पुढं नाही, मी म्हणलं असं का झालं? लोकं म्हणली, यालाच म्हणत्येत राजकारण, जवर देतो म्हणतो तवर लोकं मागं असत्यात, एकदा दिल्यावर लोकं म्हणतात दुसरं घर बघा, याने तर दिलयं आता पुढं काय देणारयं, असं झालयं का? असं करायला पाहिजे का? नाही पाहिजे, पण तुम्हाला सांगतोय, जामखेड तालुक्यात पाणी जर आलं तर मीच आणू शकतो, असे दावा आमदार राम शिंदे यांनी हळगाव पिंपरखेड दौऱ्यात बोलताना केला.
कुकडीचे पाणी आणू असं ते म्हणत होते, पण त्यांनी अडीच वर्षांत परत शब्द काढला नाही,आता म्हणतेत महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरविला, माझं ओपन चॅलेंज आहे अख्खा निवडणुकीत हा शब्द त्यांनी कधी वापरला असेल तर समोरा समोर बसून चर्चा करू, ते म्हणले निवडणुकीत आश्वासन दिलं होतं, तुमच्या अश्वासनाचा आणि याचा काय संबंध? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अख्ख्या देशासाठी जलजीवन मिशन योजना राबवली आहे. पण त्याचं श्रेय विरोधक घेत आहेत. महिलांच्या डोक्यावरचा हंडा तुम्ही नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने उतरविला आहे. याचे श्रेय आमचेच आहे, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला.
ज्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसांना त्रास दिला त्यांची अधिवेशनात विकेट काढली, दोन गडी घरी पाठवले, मस माझा स्वभाव मुंगी मारायचा नाय, पण करावं लागलं, लोकं म्हणले दोन बिबटे गेली, लोकांना वेठीस धरायचं आणि आपलं महत्व वाढायचं हा धंदा मी कधीच केला नाही, यापुढेही करणार नाही, पुढे मला जीवनात मिळेल, नाही मिळेल, आजवर जे मिळालं ते काय कमी मिळालं का ? असं देशात उदाहरण सापडणार नाही, सालं घालणाराचा मुलगा आमदार, मंत्री झाला, माझ्या बापानं एकाच मालकाकडे 35 वर्षे सालं घातली, आई बापाची पुण्याई आणि जनतेचे प्रेम, आशिर्वादामुळे मी आज इथपर्यंत आहे असे सांगत आमदार राम शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी आमदार राम शिंदे म्हणाले की, माझं तुम्हाला काहीच वाटलं नाही, कारण मी तुम्हाला वाटायसारखं काही केलचं नाही, थोडा जरी त्रास दिला असता, एखादी रेड टाकली असती, कोणाचा धंदा बंद केला असता, लोकं म्हणली असती, नाय नाय आपल्या गावचा माणूसयं, भारी माणूसयं, त्याच्यामागे रहावं लागेल, पण मी पहिला जसा होतो तसाच आहे, काही बदल झालेला नाही, होण्याची दुर दुर शक्यता नाही, शेवटी आपल्या गावचा, घरचा, हक्काचा माणूस महत्वाचा असतो, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी जनतेला भावनिक साद घातली.
आमदार राम शिंदे पुढे म्हणाले,कोणी कोणी म्हणतयं मागच्या दाराने, कसं का असेना, मागचं असो नाय तर पुढच्या असो, पुन्हा आलो का नाही, मी काय बारिक आमदार हाय का? मागच्या दाराने आला तो बारका आणि पुढच्या दाराने आला तो मोठा आमदार असं काय हाय का? मला पण पाच कोटी निधी आणि त्यांना पण पाच कोटी निधी आहे, आता माझं सरकार आहे, मी सांगेलं तेच होईल, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघात आपण सांगु तेच होईल असे संकेत यानिमित्ताने दिले.
शिंदे पुढे म्हणाले की, आपल्या बाजूच्या माणसांनी त्यांच्या बाजुच्या माणसांना विचारावं की,गेल्या अडीच वर्षांत तुझा किती सन्मान झालाय , शिवावरं नेवून सोडीत्येत, मागं गाडी हाय का नाय हे सुध्दा विचारीत नाहीत, तुझी हद्द संपली म्हणत्येत, काम झालं उतर, असे म्हणत विरोधी गटातील कार्यकर्त्यांच्या गळचेपीवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले, आपल्या इथं आम्हाला बसायला खुर्ची नाही, मंत्री असताना लाल दिव्याच्या तीन गाड्या असायच्या, सगळी माणसं जागा धरून बसायची, मी जिथं जागा मिळेल तिथं बसायचो असे सांगत आमदार राम शिंदे यांनी मंत्रिपदाच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.
तुम्हाला लाल दिव्याचं काहीच वाटलं नाही, हेलिकॉप्टरने, विमानात, चार्टर प्लेनने फिरवलेली माणसं मला सोडून गेली, त्यांचं काय वाईट केलं होतं, असे म्हणत शिंदे पुढे म्हणाले, अडीच वर्षात त्यांच्या बाजुचं कोणी मुंबईला गेलं का? तर नाही, पण मी मंत्री असताना माझा मुंबईचा बंगला गजबजून गेलेला असायचा, मतदारसंघातलं जेवढे माणसं मला मुंबईला भेटायला यायचे तेवढ्यांना घेऊन ताज असो ओबेरॉय असो की अन्य पंचतारांकित हॉटेलच्या बैठकीला घेऊन जायचो, पण मी जास्त ओपन राहिलो आणि लोकांनी माझी पोती ओळखली, पण माझी जशी पोथी ओळखली तशी तुमची पण त्यांनी पोथी ओळखली, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला.
मतदारसंघात गेल्या अडीच तीन वर्षात जी परिस्थिती निर्माण झालीय ती आता बदलायची आहे. मतदारसंघातील जनतेला आता कळून चुकलं आहे की, गेेल्या अडीच तीन वर्षांत नुसता भूलभुलैया सुरु आहे.गेल्या 70 वर्षांत पहिल्यांदा आपल्या भागाला मंत्रीपद मिळालं होतं, मी नशिबवान असल्यापेक्षा कर्जत जामखेडच्या जनतेचं नशिब उदयास आलं होतं,मी फक्त निमित्तमात्र होतो, असे आमदार राम शिंदे म्हणाले.
2009 ला अख्खे 6 गडी तुटून पडले होते, पण झालो का नाही आमदार, कोणाला वाटतं होतं का मी आमदार होईन, पण झालो, याला म्हणायचं नशिब, आता तर काय रेटतचं नाही, आता बघा ना वाढदिवसाचं काय चाललयं, एकदिलाने, जीवाने, मनापासून सगळी जनता पाठबळ देतेय,ही आई वडिलांची पुण्याई आहे, अशी भावना यावेळी आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली.