जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। आमदार राम शिंदे हे मतदारसंघात कमालीचे सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. विविध गावांना भेटी देण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. गावोगावच्या भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांशी ते सध्या संवाद साधताना दिसत आहेत. प्रत्येकाला हवा तसा वेळ ते देत आहेत. त्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसत आहे. आमदार राम शिंदे यांनी खर्डा भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांचे गावोगावी जंगी स्वागत झाले. शिंदे यांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसू लागले आहे.
आमदार राम शिंदे यांनी रविवारी खर्डा शहराला भेट दिली. यावेळी खर्डा भाजपच्याने शिंदे यांची बसस्थानक ते खर्डा ग्रामपंचायत कार्यालय अशी वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली. यावेळी खर्डा ग्रामपंचायत, खर्डा भाजप, तसेच स्थानिकांनी राम शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदारपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार केला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
जलसंधारण खातं मिळाल्यानंतर खर्डा परिसरात जलसंधारणाचं मोठ्या प्रमाणात कामं केलं. त्यामुळे मागच्या चार पाच वर्षाच्या काळात या भागाला टँकर लागला नाही. खर्डा परिसरातील सर्व वाड्यांना आणि गावं डांबरीकरण रस्त्याने जोडले. करोडोंचा विकासनिधी या भागाला दिला. 1999 साली स्वातंत्र्य गोपीनाथ मुंडे यांनी अमृतलिंग प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. परंतू काही कारणाने 15 वर्षे या प्रकल्पाचे काम प्रलंबित होतं, ते काम देखील पुर्ण केलं. मुंडे साहेबांनी भूमिपूजन केलेलं काम माझ्या हातून पुर्ण झालं हे माझं भाग्य आहे.स्वातंत्र्यानंतर आपल्या भागाला पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते, त्या पदाच्या माध्यमांतून आपल्या भागाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला, असे यावेळी राम शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून, लोकशाहीमधलं आपलं सरकार, आपला माणूस, आपला लोक प्रतिनिधी ही भूमिका घेऊन गेल्या 10 वर्षांच्या कालखंडामध्ये काम केलं आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतं. लोकांना तिकीट मिळालं म्हटलं तरी मुंबईत मोठी गर्दी केली.फाॅर्म भरायला गर्दी केली.निवडून यायच्या दिवशी तर रात्रभर गर्दी होती हीच माझ्या कामाची पावती आहे.
यावेळी बोलताना आमदार राम शिंदे यांनी 2019 च्या निवडणुकीतील पराभवानंतरही पक्षाने विधानपरिषदेवर का वर्णी लावली याबाबत भाष्य केले. शिंदे म्हणाले की, 94 हजार मतदान आपण 2019 साली दिलं, 2014 च्या तुलनेत 10 हजार मताधिक्य अधिक होतं,तरी पण पराजय झाला पराजय जरी झाला तरी पक्षाच्या नेतृत्वानं आणि पक्षानं आपण दिलेल्या 94 हजारातील प्रत्येक मताचं मूल्यमापन करत अडीच वर्षांच्या आत पुन्हा एकदा आमदार करून आपल्यामध्ये पाठवलं असं सांगत कर्जत – जामखेड मतदारसंघातील भाजपच्या वोट बँकेची पक्षाने दखल घेतल्याचे शिंदे यांनी आवर्जून नमुद केले.
अडीच वर्षांत मी पुन्हा आमदार म्हणून आलो त्याचबरोबर सरकार पण आलं. पुन्हा सरकार आल्यावर तुमचा सासुरवास पण कमी झाला.फेड जागच्या जागी असते. शेवटी हुकुमशाहीमध्ये आपण नाहीयेत.आपल्याकडे इंग्रज नव्हते परंतू निजाम होते. निजामशाही आली की काय याचा भास होत होता. पण मी यायच्या आगोदरच गुण आलाय. गुण सर्वदूर आलाय. कालपासून तर जास्त आलाय असे सांगत राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला.