आमदार राम शिंदे विजयोत्सव : सिध्दटेक ते जामखेड गुलालाची प्रचंड उधळण, राम शिंदेंचे मतदारसंघात अभूतपूर्व स्वागत, भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । ढोल – ताश्यांचा गजर.. गुलालाची प्रचंड उधळण..गावागावात दिवाळीसारखा उत्साह.. ऊर्जादायी कार्यकर्त्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह आणि कोण आला रे कोण आला… कर्जत – जामखेडचा वाघ आला.. राम शिंदे साहेब तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ है.. सारख्या घोषणांचा गजर.. बुधवारचा दिवस गाजला तो आमदार राम शिंदे यांच्या विजयोत्सवाने… ठिकाण होतं.. कर्जत जामखेड मतदारसंघ.
विधानपरिषद निवडणूकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आमदार राम शिंदे हे बुधवारी पहिल्यांदा मतदारसंघात दाखल झाले. बुधवारी सकाळी 8 वाजता सिद्धटेक येथील सिध्दीविनायकाचे दर्शन आणि आरती करुन त्यांनी आपल्या दौर्यास सुरवात केली. सिद्धटेक येथे सकाळपासून कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.आमदार राम शिंदे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करुन जंगी स्वागत करण्यात आले.
सिद्धटेक ते राशिन दरम्यान राम शिंदे यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिंदे यांचा ताफा राशीनला धडकला. राम शिंदे यांनी जगदंबा देवीची आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली.यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. राशीन येथील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आमदार राम शिंदे यांचा भव्य असा हार घालून नागरी सत्कार करण्यात आला. फुलांची आणि गुलालाची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला.
राशीन ते कर्जत दरम्यान अनेक नागरिक आणि शिंदे समर्थक राम शिंदे यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते. सर्वांना भेटत.. सत्कार स्वीकारत राम शिंदेंचा ताफा कर्जतच्या दिशेने पुुढे जात होता.. तिकडे कर्जतमध्ये राम शिंदे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते वाट पाहत होते.
अखेर शिंदे यांचा ताफा कर्जत प्रांत कार्यालयासमोर दाखल झाला.हजारो समर्थकांनी राम शिंदे यांचे जंगी स्वागत केले. कर्जत प्रांत कार्यालयापासून जंगी मिरवणुकीला सुरुवात झाली. गाव – खेड्यातला छोटा कार्यकर्ता ते पदाधिकारी राम शिंदे यांच्या विजयोत्सवात नाचताना दिसत होते.
तरुणांचा उत्साह तर टिपेला पोहचला होता. बेधुंद तरुणाई नाचून हा विजयोत्सव साजरा करताना दिसली. या रॅलीत राम शिंदे यांना भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी लोटली होती. रॅलीनंतर गोदड महाराजांची आरती करून दर्शन घेण्यात आले.
कर्जत ते चौंडी या प्रवासात राम शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दुपारी 3 च्या सुमारास राम शिंदे यांचे जन्मगाव चोंडीत आगमन झाले. चोंडीच्या सीना नदीच्या पुलावर शिंदे यांच्या स्वागतासाठी आख्खा गाव वाट पाहत होता. गावकऱ्यांच्या स्वागताने राम शिंदे भारावून गेले होते.
यावेळी चोंडी ग्रामस्थांनी राम शिंदे यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. गावातील महिलांनी औक्षण केले. तिसर्यांदा आपल्या गावचा पोरगा आमदार झाला हा आनंद चोंडीकरांच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होता. गावकरी बेधुंद होऊन विजयोत्सव साजरा करताना दिसत होते. गावातील लहान मुलेही आनंदोत्सवात सहभागी झाले होते. राम शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली, पावसात मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीनंतर राम शिंदे यांचे निवासस्थानी आगमन झाले. यावेळी राम शिंदे यांच्या मातोश्री आणि कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे औक्षण करुन जंगी स्वागत केले. त्यानंतर राम शिंदे यांनी आईचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी राम शिंदे आणि त्याच्या मातोश्री दोघेही भावनिक झाले. दोघांच्या डोळ्यांत आश्रू होते. हे दृश्य पाहून उपस्थितांंचेही डोळे आपसुकच पाणावले.
चोंडीत काही काळ थांबून राम शिंदे हे हळगाव, पिंपरखेड, अरणगाव, पाटोदा या भागाच्या भेटीला रवाना झाले. हा परिसर राम शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागात शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
त्यानंतर राम शिंदे यांचा ताफा 6 वाजता जामखेड शहरात दाखल झाला. शिंदे जामखेडमध्ये दाखल होताच तरुणांनी आणि शिंदे समर्थकांनी शिंदे यांचे जंगी स्वागत केले. जामखेड विश्रामगृह परिसरातुन राम शिंदे यांच्या विजयी रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीतून भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
भरपावसात ही रॅली निघाली होती. पाऊस सुरु होताच रॅलीत अधिकच उत्साह संचारला होता. गावखेड्यातला छोटा कार्यकर्ता ते पदाधिकारी राम शिंदे यांच्या विजयोत्सवात नाचताना दिसत होते.
कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये आमदार राम शिंदे यांचे जंगी स्वागत
विश्रामगृह ते खर्डा चौक दरम्यानच्या रॅलीत राम शिंदे यांच्या भेटीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारत राम शिंदेंची रॅली खर्डा चौकात दाखल होताच येथे तर गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले.
प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने राम शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने राम शिंदे यांना भला मोठा फुलांचा हार घालण्यात आला.उत्साहसंचारलेल्या जनसमुदायासोबत राम शिंदे यांनी डान्स केला.
नागरिकांचे प्रचंड प्रेम.. कार्यकर्ते आणि तरुणांचा जोश पाहून राम शिंदे यांनी सर्वांना अभिवादन केले.तसेच मुस्लिम समाजाच्या लोकांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला.
त्यानंतर राम शिंदेची रॅली शनिमंदीर परिसरात गेली. त्याठिकाणी शिंदे यांनी मंदिरात जाऊन आरती करुन दर्शन घेतले.त्यानंतर रॅली बीड रोडने मार्केटयार्ड परिसरात गेली. तिथे रॅलीची समाप्ती झाली. अश्याप्रकारे बुधवारचा दिवस आमदार राम शिंदेंनी गाजवला.