जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 2019 ला अमेठीत राहूल गांधींचा कार्यक्रम झाला, आता येत्या 2024 ला बारामतीचा नंबर असणार आहे. 17 महिने आधीपासून पक्षाने मिशन बारामती हाती घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण ह्या सप्टेंबर महिन्यात तीन दिवस बारामती मतदारसंघात तळ ठोकून असणार आहेत. भाजपने ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे. बारामतीवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे अवाहन बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी इंदापूरात बोलताना केले.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी असलेले आमदार राम शिंदे हे आजपासून दोन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यावर आहेत. आज त्यांनी इंदापूरला भेट देऊन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला.
शिंदे पुढे म्हणाले की, प्रत्येकाचा काळ येत जात असतो, त्यामुळे येत्या 2024 च्या निवडणुकीत बारामतीचा कार्यक्रम करायचा आहे. भाजपकडे क्षेपणास्त्र तयार आहे. समोरच्यांचा फुल कार्यक्रम होणार आहे असे सांगत लोकशाही आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार सर्वांना आहे. तसा भाजपलाही आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीच्या काटेवाडीतील बुथवर जाऊन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचाही जोरदार समाचार घेतला. दोन महिन्यात कोणाकोणाला नोटीसा आल्या ? काहींच्या चेहर्याकडे बघितले की लगेच लक्षात येते. नाव घ्यावं लागत नाही, असा खोचक टोला लगावत शिंदे यांनी आमदार रोहित पवारांना लक्ष केले.
दरम्यान आमदार राम शिंदे यांनी आज इंदापूरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी भेट दिली. त्या ठिकाणी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्यांनंतर शिंदे यांनी अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विरोधकांवर चौफेर हल्ला चढवला. तसेच अगामी 2024 लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड जिंकायचाच असा इरादा बोलून दाखवत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भारतीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.