आमदार राम शिंदेंचा रोहित पवारांवर गंभीर आरोप : “सावंत साहेब नका ना जाऊ, साहेब नका ना जाऊ माझ्या मतदारसंघात”, “शरद पवार चुलत आजोबा असल्यामुळेच रोहित पवार तसे बोलतात” – राम शिंदेंची रोहित पवारांविरोधात जोरदार फटकेबाजी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। 28 ऑक्टोबर 2022 । आमदार राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी आज दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्याविरोधात जोरदार हल्ला चढवला. भुरटं चॅलेंज देऊ नये, गोलमाल करायचं नाही, काय असलं तर थेट, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी पुन्हा एकदा रोहित पवारांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे ओपन चॅलेंज दिले.
यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, “आजच्या दिवाळी फराळ कार्यक्रमास आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज चोंडीला आले होते. मंत्री महोदयांनी माझ्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला भेट दिली, त्यांना देखील दहा फोन करून सांगितलं, साहेब नका ना जाऊ, साहेब नका ना जाऊ माझ्या मतदारसंघात, अरे, माझे आणि तानाजी सावंत साहेबांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, असं कुठं असतं का राजकारणात,” असे म्हणत राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत आरोपांचा धुराळा उडवून दिला आहे.
आमदार राम शिंदे हे मागच्या दाराने आमदार झाले आहेत अशी टीका आमदार रोहित पवार आणि शिंदे विरोधकांकडून सातत्याने होते, यावर बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले कि, “मला ज्या मुद्द्यावरती टोकलं, मागच्या दाराने आलेत, मी विधान परिषदेेर आमदार झालोय हे मला मान्य, 2019 साली माझा पराभव झाला हेही मला मान्य आहे. परंतू आदरणीय शरद पवार साहेब गेली 15 वर्षे झाली मागच्या दाराने आहेत, आणि दररोज दैनंदिन राज्य आणि केंद्र सरकारला ते सल्ले देतात, मग माझ्यावर हे बोलतात मागच्या दाराने, तर त्यांना असं म्हणायचयं का? पवार साहेब देखील मागच्या दारानेत, माझं त्याच्यावर असं म्हणणं आहे की, पवार साहेब हे त्यांचे सख्खे आजोबा जर असते तर ते असं म्हटले नसते, चुलत आजोबा असल्यामुळं कदाचित त्यांनी वक्तव्य केलं असावं,” अशी खोचक टीका करत आमदार शिंदे यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला.
“मी हाडाचा कार्यकर्ताय आणि कार्यकर्त्याचा नेता झालो, मंत्री झालो, आणि म्हणून मी त्यांचे चॅलेंज स्विकारलं, पण विधान परिषदेचा आमदार राजीनामा देऊन निवडणूक लागत नाही, त्यासाठी विधानसभेच्या आमदाराने जर आमदारकीचा राजीनामा दिला तरच निवडणूक लागेल असे सांगत मी त्यांना चॅलेंज देतो, निवडणूक लागली कि मीही राजीनामा देऊनच तुमच्या पुढे उभा राहीन, मी बिगर राजीनाम्याचा पुढं उभा राहणार नाही, त्यामुळे राजीनामा आता विधानसभेच्या आमदाराने देणं अपेक्षित आहे. आणि मी जर राजीनामा देऊन निवडणूक लागली असती तर मीही दिला असता,” असे म्हणत राम शिंदे यांनी पुन्हा एकदा रोहित पवारांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे खुले अव्हान दिले.
“आमदार राम शिंदे पुढे म्हणाले की, प्रश्न असाय की, चॅलेंज देऊन, असं भुरटं चॅलेंज देऊ नये, आलं का लक्षात, असं गोलमाल करायचं नाही, काय असलं तर थेट असे त्यामुळं चॅलेंज मी पण दिलयं, राजीनामा देऊन त्यांनी मैदानात उतराव, बघू कर्जत-जामखेडच्या जनतेच्या मनातकाय आहे ते, आणि मी देखील राजीनामा देऊनच पुढे उभा राहीन, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी मी निवडणूकीस सज्ज आहे असा इशारा दिला.”