जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीला टार्गेट करण्याची मोहिम हाती घेतली आहे. सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी या आधी केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोशी संबंधित आज एक ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यात नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांची प्रकरणं बाहेर काढण्याचे इशारे दिले जात आहेत. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा मोठा घोटाळा पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असे ट्विट काही दिवसांपुर्वी केले. कंबोज यांच्या ट्विट नंतर राष्ट्रवादीकडून तिखट प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.
आमदार रोहित पवार यांनीही बुलढाणा दौऱ्यात कंबोज यांचा जोरदार समाचार घेतला होता. मोहित कंबोज यांच्या टि्वटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.
रोहित पवारांनी हल्लाबोल केल्यानंतर कंबोज यांनी सोमवारी एक ट्विट केले आहे. यातून अप्रत्यक्षपणे रोहित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार असं ट्विट कंबोज यांनी केलं होतं, त्यानंतर कंबोज यांनी आज केलेल्या ट्विटनुसार रोहित पवार आणि बारामती ॲग्रोवर कृपादृष्टी की वक्रदृष्टी? याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आमदार रोहित पवार आणि बारामती ॲग्रो यांच्याबद्दल आपण अभ्यास करत असल्याचा इशारा कंबोज यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपच्या रडारवर विरोधी पक्षातील तरुण नेते तर नाहीत ना ? याची चर्चा आता रंगली आहे.
मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बारामती अॅग्रो लिमिटेड स्टार्ट अपसाठी केस स्टडी आहे! मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे! यामागील यशोगाथा समजून घेण्यास तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे असा मजकुर असलेले ट्विट केले आहे. कंबोज यांची रोहित पवारांवर कृपादृष्टी असणार की वक्रदृष्टी याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.
बारामती ॲग्रोच्या माध्यमांतून आमदार रोहित पवार यांनी उद्योग विश्वास मोठी भरारी घेतली आहे. तरूण वयात यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. राज्यातील नव उद्योजक तरुणांसाठी रोहित पवार हे रोल मॉडेल ठरले आहेत. अनेक तरूण वेगवेगळ्या उद्योगात सक्रीय झाले आहेत. भाजपा नेते मोहित कंबोज हे बारामती ॲग्रोची यशोगाथा राज्यातील तरुणांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सकारात्मक अंगाने प्रयत्नशील असणार आहेत का ? की त्याआडून आरोपांचे शिंतोडे उडवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान भाजपाने ते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटला आमदार रोहित (दादा)पवार हे काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.