खासदार डाॅ. सुजय विखे पाटलांचा राष्ट्रवादीवर कडाडून हल्ला, “म्हणाले त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे”
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : “राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचा मास्टर प्लॅन तयार केला होता. प्रत्येक वर्षात किती पैसे खायचे हे त्यांनी ठरवले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा प्लान उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांची आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे”, असे म्हणत खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल चढवला.
शिखर बँक घोटाळा प्रकरणाची पुन्हा ईडीकडून चौकशी सुरु केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर भाष्य करताना भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करत सडकून टीका केली आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची अवस्था वाईट झाल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे. शिखर बँक घोटाळ्यात पुन्हा चौकशी सुरू झाल्यास माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला होता. आता राज्यातील सत्तांतरानंतर पुन्हा या प्रकरणाच्या तपासाची मागणी जोर धरू लागली आहे. अजित पवारांसहीत अन्य ७६ संचालकांची पुन्हा ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार आणि अन्य ७६ जणांविरोधात पुढील कारवाई करण्यासाठी ठोस पुरावे आढळले नसल्याचे आर्थिक गुन्हे विभागातर्फे (ईओडब्ल्यू) सांगण्यात आले होते. तसा अहवाल ‘ईओडब्ल्यू’कडून न्यायालयात सादर करण्यात आला होता. पण, मूळ तक्रारदाराने केलेली निषेध याचिका आणि ईडी अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे ‘ईओडब्ल्यू’ने म्हटलं आहे.
यावर राजकीय संदर्भ देत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी काय जो कोणी राज्यकर्ता असतो तो निर्णय घेतो अशापद्धतीचं राजकारण सुरु आहे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.