जामखेड : खासदार सुप्रिया सुळे आल्या आमदार राम शिंदेंच्या रडारवर, “अहो ताई.. तुम्ही ज्या रस्त्याने आलात, कौतुक केलं ना, तो रस्ता..” आमदार राम शिंदेंची ‘ती’ फेसबुक पोस्ट राज्यात आली चर्चेत !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आमदार राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार हा संघर्ष अधिकच तापला आहे.आमदार राम शिंदे यांनी वाढदिवसाच्या दौऱ्यात रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवत मतदारसंघात जोरदार राजकीय बार उडवून दिला. गेल्या चार पाच दिवसांपासून शिंदे यांनी संपुर्ण मतदारसंघ चांगलाच ढवळून काढला. नव्या वर्षाचा पहिला आठवडा आमदार राम शिंदे यांनी गाजवला. रोहित पवारांचा समाचार घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळे ह्या आमदार राम शिंदे यांच्या रडारवर आल्या आहेत.राम शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक निशाणा साधणारी फेसबुक पोस्ट केली आहे, ही पोस्ट आता राज्यात चर्चेत आली आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या दोन दिवसांपुर्वी कर्जत दौऱ्यावर आल्या होत्या, यावेळी त्यांनी कर्जत – भिगवण (खेड -राशीन) रस्त्याचे कौतूक केले होते, यावेळी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीला या मतदारसंघात तुम्ही मोठ्या विश्वासाने संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. इथे आल्यावर कर्जत ग्रामीण भाग आहे, यावर माझा विश्वासच बसेना. भिगवणपर्यंत माझा लोकसभा मतदारसंघ. पुढे येताना कोणी सांगितले, की कर्जतला जाण्यास दीड-दोन तास लागतील. मात्र वेळेपूर्वीच मी येथे पोचले. मी पेपर वाचत होते. ड्रायव्हरने आवाज दिला, ‘ताई, कर्जत आलंय.’ कार्यकर्ते बाहेर वाट बघत आहेत. विकासातून आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत बदलतंय, याचा अभिमान वाटतो, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत, आमदार राम शिंदे यांनी सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. याबाबत आमदार राम शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे, त्यात म्हटले आहे की, अहो ताई.. तुम्ही ज्या रस्त्याने आलात, कौतुक केलेत ना, तो रस्ता माझ्या काळात झालाय बरं का, माहिती घ्या …आणि कौतुक करायचेच आहे तर माझे करा, असे म्हणत खोचक निशाणा साधला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात विकास कामांच्या श्रेयावरून जोरदार लढाई जुंपली आहे. आमदार राम शिंदे मंत्री असताना मंजुर झालेली कामे मीच मंजुर केली असा दावा आमदार रोहित पवारांकडून होत आहे, परंतू आता या दाव्यांची पोलखोल करण्याचा विडा आमदार राम शिंदे यांनी उचलला आहे. आमदार राम शिंदे अतिशय आक्रमकपणे रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोंडीत पकडू लागले आहेत. यामुळे सध्यातरी शिंदे हे पवारांना कात्रजचा घाट दाखवण्यात यशस्वी होत असल्याचे दिसत आहेत.
खेड ते राशिन रस्त्याचे सत्य काय ?
हॅम्प प्रोजेक्टमधून अमरापूर ते बारामती राज्यमार्ग क्र – 54 व कोंभळी फाटा ते कर्जत या हायब्रीड अँम्युटी अंतर्गत राज्यमार्गाच्या 200 कोटी रूपये खर्चाच्या कामाचे 15 /10/ 2018 मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंभळी व राशीन येथे उद्घाटन करण्यात आले होते. ही दोन्ही कामे तत्कालीन मंत्री व सध्याचे आमदार राम शिंदे यांच्या पुढाकारातून मंजुर करण्यात तातडीने या रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती.
परंतू 2019 ला आमदार राम शिंदे यांचा पराभव झाला, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. आमदार रोहित पवार यांनी सत्तेचा वापर करत आमदार राम शिंदे हे मंत्री असताना मतदारसंघात मंजुर केलेले मोठे प्रोजेक्ट रखडविले. गेल्या अडीच तीन वर्षात राशीन ते खेड व कोंभळी ते कर्जत या रस्त्याचे काम बंद होतं, परंतू राज्यात सत्तांतर होताच आमदार राम शिंदे यांनी दोन्ही प्रकल्पात जातीने लक्ष घालत दोन्ही रस्ते दर्जेदार होण्यासाठी पाठपुरावा केला. यामुळेच दोन्ही रस्त्यांच्या कामांनी वेग पकडला.
आमदार राम शिंदेंच्या रडारवर सुप्रिया सुळे
आमदार राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री असताना सन 2018 साली अमरापूर ते बारामती राज्यमार्ग क्र – 54 ला मंजुरी मिळवली होती, सदर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन त्यांच्याच काळात झाले होते. शिंदे यांच्या प्रयत्नातून झालेल्या कामाचे श्रेय खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवारांना देऊन नाहक वाद उभा केला आहे, सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर आता आमदार राम शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. अहो ताई.. तुम्ही ज्या रस्त्याने आलात, कौतुक केलेत ना, तो रस्ता माझ्या काळात झालाय बरं का ,माहिती घ्या …आणि कौतुक करायचेच आहे तर माझे करा, असे म्हणत फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका, हेच अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न शिंदे यांनी ट्विटर पोस्टच्या माध्यमांतून केला आहे.
सोशल मिडीयावर भाजप आक्रमक
अमरापूर ते बारामती राज्यमार्ग क्र – 54 या रस्त्याचे काम आमदार रोहित पवारांमुळेच मार्गी लागले हे पटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या त्या वक्तव्याचे पडसाद आता सोशल मिडीयावर जोरदार उमटू लागले आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.