Sujay Vikhe Patil । मोदी-फडणवीसांनी कारवाई केली तरी शिवसेनेसोबत राहण्याचा माझा निर्णय – सुजय विखे पाटील
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यसभा निवडणूक निकालानंतर राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरु आहे. त्यातच भाजपचे अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेसंबंधी महत्वाची घोषणा केली आहे. (My decision to stay with Shiv Sena even if Modi-Fadnavis take action – Sujay Vikhe Patil)
खासदार डॉ सुजय विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसेनासंबंधी महत्वाची भूमिका मांडल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
खासदार डॉ सुजय विखे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, राज्यात राजकीय परिस्थिती काहीही असो,अहमदनगर जिल्ह्यात मी शिवसेनेसोबत आहे. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहील.
जेव्हा जेव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा तेव्हा मी शिवसेनेसोबत उभा राहील, शिवसैनिकांना संकटात एकटे सोडणार नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या विरोधात कारवाई केली तरी चालेल पण मी अहमदनगर जिल्ह्यात शिवसैनिकांसोबत आहे, असे सांगून खासदार सुजय विखे पाटील यांनी राजकीय वर्तुळात सनसनाटी निर्माण केली.
विखे पुढे बोलताना म्हणाले की, येथील राजकारण ओळखतो, विचारांचा वारसा आहे, तो वारसा टिकवण्यासाठी असे निर्णय घेणे आवश्यक आहे, यावर शिवसेनाची काय भूमिका असेल हे मला माहीत नाही, मात्र इथे शिवसेनेने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल.
थेट बोलण्याची हिम्मत ठेवणारा मी भाजपचा खासदार
आगामी काळात कोणाची कोणासोबत आघाडी होईल हे मला माहित नाही. मात्र, मी शिवसेनेसोबत राहण्यास ठाम आहे. यापुढे माझ्याकडून शिवसेनेवर कधीही टीका होणार नाही, याची ग्वाही देतो अशा प्रकारची भूमिका घेणारा, असं थेट बोलण्याची हिम्मत ठेवणारा मी भाजपचा खासदार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेसाठी खासदार विखेंची नवी चाल
दरम्यान खासदार सुजय विखे पाटील यांनी पारनेर दौऱ्यात शिवसेनेविषयी घेतलेल्या भूमिकेविषयी राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले आहे. अगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विखे गटाची सत्ता यावी यासाठीच खासदार विखे यांनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची रणनिती तर आखली नाही ना ? अशी चर्चा अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात रंगु लागली आहे.