जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यसभेच्या 6 जागांचे निकाल समोर येताच राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा माहोल रंगलाय. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर शिवसेनेला डिवचण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. यात अहमदनगर दक्षिणचे भाजपा खासदार डाॅ सुजय विखे पाटलांनी उडी घेत आगीत तेल ओतले आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे धनंजय महाडिक आणि संजय पवार या दोन उमेदवारांमध्ये चुुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला. शिवसेना उमेदवार संजय पवार यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतू संजय पवार यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा दावा भाजपचे खासदार डाॅ सुजय विखे पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाजप खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे नेहमी रोखठोक राजकीय वक्तव्य करण्यासाठी ओळखले जातात. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर डॉक्टर विखे यांनी आपली भूमिका मांडली आहे. शिवसेना उमेदवाराच्या पराभवामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव अपक्षांमुळे झाला नसून तो राष्ट्रवादी मुळे झाला आहे, राष्ट्रवादी हा खेळ करणारा पक्ष आहे,या पक्षाकडून शिवसेनेला संपवण्याचे काम सुरू आहे असा सनसनाटी आरोप विखे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सर्व षडयंत्र ओळखावं आणि राष्ट्रवादीपासून दूर व्हावं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
विखे पुढे बोलता म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची निकाल धक्कादायक नसल्याची प्रतिक्रिया म्हणजे त्यांना हे अपेक्षित होतं, याचा शिवसेनेने विचार करणं गरजेचं आहे अशी खोचक टीका करत पराभव होतो तेव्हा अनेक कारणे शोधली जातात, मात्र एवढ्या लांब न जाता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीशी चर्चा करावी ते सांगतील असं का केल असे म्हणत विखे यांनी जोरदार राष्ट्रवादीवर हल्ला चढवला
यावेळी बोलताना डॉ सुजय विखे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी शिवसेनेला संपवण्याचे काम करत आहे, माझं हे भाकीत खरं होताना दिसत आहे असा टोला त्यांनी लगावला.