जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भाजपचे अहमदनगरमधील जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ पडणार, अशी चर्चा दिवसभर अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणासह राज्यात सुरू होती, मात्र भाजपने विखे यांच्या नावाऐवजी दुसऱ्या नावाला पसंती दिली आहे.
राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष काल 30 जूून 2022 रोजी थांबला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यामुळे राज्यात भाजप प्रणित सरकार सत्तेवर आले आहे.
राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप प्रणित सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्याआधी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने एक नाव निश्चित केले आहे.
भाजपचे कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत.त्यांच्या नावावर भाजप आणि शिंदे गटाची सहमती झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारची शेवटची मुदत आहे. तर रविवारी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुीनंतर नव्या सरकारला विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राहुल नार्वेकर यांना तब्बल 170 च्या आसपास आमदारांचे समर्थन मिळू शकते असे बोलले जात आहे. नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यास ते राज्यातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असणार आहेत.
राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारला रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कसल्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल. त्यावरच या सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागणार अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळासह अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभर सुरू होत. परंतु विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार राहुल नार्वेकर यांचे नाव निश्चित झाल्याने विखे यांच्या नावाची सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.
वास्तविक राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हते, त्यांना शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विखे यांची शिंदे यांच्या मंत्रिमंडळात समावेश होतो का? याकडे अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.