जामखेड टाइम्स वृत्तसेवा । पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणे आवश्यक होते, पण महाविकास आघाडीने ही निवडणुक जनतेवर लादली आहे. परंतू या पोटनिवडणूकीत भाजपच्या उमेदवार आश्विनीताई लक्ष्मणराव जगताप यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील पिंपरी चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा प्रचार रंगात आला आहे. भाजप विरूध्द महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत होत आहे. पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या पत्नी आश्विनीताई जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आश्विनीताई जगताप यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रा राम शिंदे हे मैदानात उतरले आहेत. आमदार राम शिंदे यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या भागाचा आज दौरा करत नागरिकांशी संवाद साधला. आश्विनीताई जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी आमदार शिंदे यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, दिवंगत आमदार लक्ष्मणराव जगताप यांनी या भागात विकासाचा मोठा झंझावात निर्माण केला होता. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर होत असलेली पोटनिवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते, परंतू विरोधकांनी जनतेवर निवडणुक लादली आहे. असे असले तरी चिंचवडची ही जागा लागल्यात जमा आहे.
लक्ष्मणभाऊंनी आमदार असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांतून या भागामध्ये विकास खेचून आणण्याचं काम सातत्याने निरंतर केलं, त्यांच्या विचारांच्या पाठाशी या भागातील जनता पोटनिवडणुकीत खंबीरपणे उभी राहिल हा ठाम विश्वास आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचविण्याचे काम भारतीय जनता पार्टी करते त्यामुळे मनामनात – घराघरात भारतीय जनता पार्टीचे नाव आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष भेदरून गेले आहेत, असा टोला आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी बोलताना लगावला.
आश्विनीताई जगतापांचा विजय कोणीच रोखू शकत नाही, अशी पिपरी चिंचवडमधली परिस्थिती आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता जोमाने प्रचार करावा, राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आहे. या सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती तसेच लक्ष्मणभाऊंनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवावे, येत्या 26 तारखेला होणाऱ्या मतदानात आश्विनीताई लक्ष्मणराव जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून लक्ष्मणभाऊंना श्रध्दांजली अर्पण करावी, असे अवाहन यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.