कर्जतमध्ये विखे शिंदे करणार मोठा धमाका : शुक्रवारी कुणाविरोधात फुटणार राजकीय बाँम्ब ? उत्सुकता शिगेला
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | “गेल्या काही दिवसांपासून कर्जत – जामखेड मतदारसंघात मोठ्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत.पक्षांतर, राजकीय आरोप – प्रत्यारोप, विकासाच्या वल्गना, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर होणारे दबावाचे राजकारण अश्या अनेक घडामोडींनी मतदारसंघात धुराळा उडवून दिला आहे. विशेषता: या राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू सध्या कर्जत तालुका ठरला आहे.”
“विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी गेली दोन वर्ष मतदारसंघात सक्रीय सहभाग घेतला नव्हता. शिंदे हे पराभवातून सावरले नाहीत अशी चर्चा दोन वर्षे राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता राम शिंदे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. शिंदे हे आक्रमकपणे मतदारसंघात सक्रीय झाल्याने सत्ताधारी गटातही जोरदार हालचाली वाढल्या आहेत.”
“माजी मंत्री राम शिंदे हे कर्जत तालुक्यात कमालीचे सक्रीय झाले आहेत. शुक्रवारी राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे कर्जत शहरात (Karjat City) उद्घाटन पडणार आहे. खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe) व जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे (Arun Mundhe) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.”
” काही दिवसांपूर्वी कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष तथा भाजपाचे नेते नामदेव (देवा) राऊत, भाजपचे नेते प्रसाद ढोकरीकर व काही नगरसेवक सह आदींनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. (Namdev Raut, Prasad Dhokarikar Join NCP) हा प्रवेश दबावतंत्राचा वापर करून रोहित पवार यांनी घडवून आणला असा आरोप भाजपकडून केला जात आहेत.भाजप नेत्यांच्या पक्षांतरामुळे कर्जत तालुक्यात भाजप बॅकफूटवर ढकलली गेली आहे. भाजप नेत्यांचे पक्षांतर झाल्यानंतर खासदार विखे यांनी जामखेड दौर्यात ओझरते भाष्य केले होते.”
“भाजप नेत्यांच्या पक्षांतरानंतर खासदार सुजय विखे व राम शिंदे यांच्या उपस्थितीत कर्जत शहरात प्रथमच शुक्रवारी कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात खासदार सुजय विखे पक्षांतर केलेल्या नेत्यांचा जोरदार समाचार घेतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.”
दरम्यान जामखेड (Jamkhed) दौर्यात खासदार सुजय विखे व माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. त्यानंतर जामखेड दौर्यात आलेल्या आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना लक्ष्य करत जोरदार निशाणा साधला होता.
“पाच वर्षातील मी केलेली विकास कामे पाहून राम शिंदेंचे डोळे पांढरे होतील असे वक्तव्य पवार यांनी केले होते. या वक्तव्याचे मतदारसंघात तीव्र पडसाद उमटले होते. कर्जतमधील विखे समर्थक भाजप नेत्याने पवार यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्यानंतर कर्जत राष्ट्रवादीकडून एका महिला नगरसेविकेने पलटवार केला होता. परंतू या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत प्रथमच सामान्य जनतेतून पवारांच्या त्या वक्तव्यावर सोशल मिडीयात जोरदार टिका झाली होती.”
“आमदार रोहित पवार हे आपल्या कामाचे सोशल मिडीयाच्या माध्यमांतून जोरदार ब्रँडिंग करतात हे गेल्या दोन तीन वर्षांपासून सातत्याने दिसून येत आहे.पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याविरोधात प्रथमच सोशल मिडीयावर मतदारसंघातून तिखट प्रतिक्रिया उमटल्या. जनता आता थेटपणे बोलायला लागली आहे. जनतेला गृहित धरण्याची चुक पवारांसाठी धोक्याची घंटा आहे.”
“दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार सुजय विखे पाटील व स्वता: राम शिंदे मोठा धमाका करणार अशी चर्चा आहे. एकुणच गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींवर विखे व शिंदे काय बोलणार ? कुणा कुणाचे वाभाडे काढणार? नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने काय बोलणार ?पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी काय भाष्य करणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.”
दरम्यान मागील महिन्यात जामखेड दौर्यात खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी नेमके काय भाष्य केलं होतं पाहूयात
सुजय विखेंचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल
खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) मागील महिन्यात जामखेड या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात विखे यांनी आमदार रोहित पवारांवर (Rohit Pawar) जोरदार हल्ला चढवला होता. तसेच पक्षांतर केलेल्यांना ओझरता उल्लेख करत इशारा दिला होता.
ना आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जातो ना दुसर्याचा कधी कार्यक्रम घेतो. राजकारणात स्वाभिमान फार गरजेचा असतो. माज वेगळा पण स्वाभिमान असायलाच हवा.जे काम माझं नाहीच त्याचं मी कधीच क्रेडिट घेऊ शकतं नाही. ही शिकवण कै. बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला दिलेली आहे. त्याच आधारावर विखे कुटूंब जिल्ह्यात विकासाचे राजकारण करत आहे असे सांगत अप्रत्यक्षपणे विखे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला होता.
काय होतं जामखेडमध्ये ? काय होतं कर्जतमध्ये? या तालुक्यांची ओळख अहमदनगर जिल्ह्याला नव्हती. या भागातला कार्यकर्ता, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य कधी जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर त्याला कुणी विचारत नव्हतं. कर्जत जामखेडला अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाच्या नकाशावर जर कोणी आणलं असेल तर त्याचं सर्व श्रेय राम शिंदे यांचं आहे. दुसरं कुणाचं नाही. राम शिंदे यांचे कौतुक करत विखे यांनी जोरदार बॅटिंग केली होती.
ग्रामपंचायतीला 15 व्या वित्त आयोगाचा निधी केंद्राचा. प्रत्येकाला मिळणारी लस केंद्र सरकारची, कोविड काळात मिळणार धान्य केंद्र सरकारचं, नॅशनल हायवेचे सर्व रस्ते केंद्र सरकारचे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना केंद्राची,60 वर्षाच्या व्यक्तीला लाभ देणारी योजना केंद्र सरकारची, मग (विरोधकांचं) ह्यांचं आहे काय ? ह्यांचं फक्त फोटो, बोर्ड, आणि कार्यक्रम असा जोरदार प्रहार विखे यांनी पवारांना लगावला होता.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार ; सर्रास असा विकास चाललाय – राम शिंदे
मागील महिन्यात जामखेड तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री राम शिंदे म्हणाले होते की, पाच दिवसानंतर निवडणुकीला दोन वर्षे पुर्ण होतील. मी दिवस मोजतोय. तुम्ही मोजतात की नाही मला माहित नाही. त्यामुळं आता तीन वर्षे अशीच कळ सोसायची. त्यांना गर्दी आवडत नाही तुम्ही करायची प्रयत्न करू नका. आता तुम्हाला कळलयं, मला कळलयं, कवा बवा माणसं म्हणायची इथून जायचे पण काचच खाली करत नव्हते.आता ती काच खाली नाही आणि दिसतही नाही असा टोला लगावत इकडून तिकडून कुणी काय केलं बोळीत गाटून, वेशीत आडवून , तोंड दाबून बुक्क्यांचा मार ; सर्रास असा विकास चाललाय अशी घणाघाती टीका शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली होती.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले होते की, “सगळ्यांची चेहरे बघतोय, सगळ्यांना कसं बरं वाटतयं, मोक्कारचं बरं वाटतयं, आता सांगता येईना अन बोलता येईना, निव्वळ अवघड जाग्यावरचं दुखणं झालंय, पण शेजारच्या गड्याला काम दाखवलं, कशी जिरवली म्हणता? माझी तर जिरली तर जिरली, पण आता जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा सगळी माणसं म्हणतात आमची पण जिरली” असे म्हणत माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या परिस्थितीवर तिखट शब्दांत भाष्य केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची वेदनाही यावेळी बोलून दाखवली. तसेच आमदार रोहित पवार यांच्या कारभारावर जोरदार आसूड ओढले होते.
रोहित पवार गरजले : माझी पाच वर्षे जेव्हा ते बघतील, तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झालेले असतील
माजी मंत्री राम शिंदे यांनी जामखेड दौर्यात आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांचा जोरदार समाचार घेतला होता. पवार म्हणाले, राम शिंदे हे सातत्याने राजकीय भाष्य करत आहेत. त्यावर मी सातत्याने बोलावं असं काही नाही. मला जे काही महत्वाचं वाटतं ते मी करतो. लोकांमध्ये जातोय,आणि लोकांशी बोलतोय. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय असं सांगत पवार यांनी राम शिंदे यांना आपण जास्त महत्व देत नाही असे पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
राम शिंदे यांनी दहा वर्षांत जे केलं नाही ते मी दोन वर्षांत केलं आहे. मला आज काही बोलायचं नाही, मी आकड्यात खेळणारा व्यक्ती नाही, काम झालं पाहिजेल,कामं सुरू झाले पाहिजेल, त्यातून लोकांचं हित जोपासलं पाहिजेल एवढचं मला बोलायचं आहे, असं सांगत पवार पुढे म्हणाले, आकडेचं दाखवायचेत पण मला अजून तीन वर्षे आहेत. अत्ताच ते इलेक्शनच्या गप्पा करायला लागलेत. माझी पाच वर्षे जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झालेले असतील कारण ते मंत्री असताना जे करू शकले नाहीत ते मी साधा आमदार असताना करून दाखवलेलं आहे. ते तर पाच पाच खात्याचे मंत्री होते असा जोरदार निशाणा आमदार रोहित पवार यांनी आमदार शिंदे यांचे नाव न घेता लगावला होता.
First Publisher : jamkhedtimes.com
Web Title : political blast in Karjat on Friday presence of Sujay Vikhe and Ram Shinde
वेब शिर्षक : कर्जतमध्ये विखे शिंदे करणार मोठा धमाका : शुक्रवारी कुणाविरोधात फुटणार राजकीय बाँम्ब ? उत्सुकता शिगेला